कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत मुंबईतून कोकणात गावी दाखल होणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर सोडल्या जाणार आहेत. इतकेच नाही तर अलीकडेच सुरू करण्यात आलेली कोकण रेल्वे मार्गावरची वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गणेशोत्सव कालावधीतही गाडी हाऊसफुल्ल झाली आहे.
गणेशोत्सव आता अगदी महिनाभराच्या अंतरावर असल्याने कोकणात येण्यासाठी मोठी तयारी गणेशभक्तांकडून सुरू झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचा असलेला मुंबई ते कोकण प्रवास त्यामुळे चाकरमानी कोकणात गावी जाण्यासाठी आपल्या तिकिटाची आधीच व्यवस्था करत असतात. त्यामुळे आता कोकणात जाण्यासाठी आणखी चार गाड्यांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध झाला आहे.
गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी याआधी अनेक फेऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर आणखी काही गाड्यांची भर पडली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार उधना ते मडगाव ही द्वि साप्ताहिक गाडी (09020) दि. 16 20 व 23, 27, 30 सप्टेंबर 2023 रोजी उधना येथून दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मडगाव येथून (09019) उधनासाठी निघणारी गाडी दिनांक 17, 21, 24, दिनांक 28 सप्टेंबर 2023 दिनांक 01 ऑक्टोबर 2023 या दिवशी गणपती स्पेशल गाडी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि सुरत जवळील उधना येथे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ते पोहोचेल अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे
पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी आणि गेल्याच महिन्यात सुरू झालेली वंदे भरत एक्सप्रेस आत्ताच फुल झाली आहे. गणेशोत्सव कालावधीतील या आलिशान गाडीच्या फेऱ्या हाऊस फुल्ल धावणार आहेत.
पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी गौरी विसर्जन होणार आहे. यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई- मडगाव तसेच मडगाव मुंबई अशा अप आणि डाऊन मिळून दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या नऊ फेऱ्यांचे आरक्षण आत्ताच फुल झाले आहेत. या नऊ फेऱ्यांसाठी सध्या प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू आहे.