केंद्रीयमंत्री राणेंच्या गावात भाजपा कार्यकर्ते आमने-सामने वरवडे सोसायटी साठी भाजपाच्याच दोन गटांत लढत

0
147

 

सिंधुदुर्ग – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावात भाजपाचेच दोन गट आमने-सामने आले असून त्याला निमित्त ठरले आहे वरवडे सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक ! वरवडे गाव हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे गाव. वरवडे गावातील राजकीय वर्चस्ववाद राणे समर्थक असलेल्या दोन गटांत मागील ग्रा.पं. निवडणुकीपासून सुरू आहे. तोच वर्चस्ववाद सोसायटी निवडणुकीत पुन्हा अनुभवायला मिळाला असून पं स माजी सभापती प्रकाश सावंत आणि भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत या दोन गटात आज सोसायटीची निवडणूक होत आहे.

दोन्ही गटाकडून भाजपा पुरस्कृत पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यानी सोसायटी वर कब्जा मिळवण्यासाठी कंबर कसली असून अत्यंत चुरशीने सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 13 सदस्य असलेल्या वरवडे सोसायटी मध्ये भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील उमेदवार दोन्ही गटाकडे नसल्यामुळे सध्या एकूण 12 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे.

प्रकाश सावंत आणि सोनू सावंत या दोन्ही गटांत बिनविरोध सोसायटी निवडणूक होण्यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आज ही निवडणूक होत आहे. 12 जागांपैकी एका जागेवर प्रकाश सावंत गटाच्या उमेदवाराने विरोधी सोनू सावंत गटाच्या एका उमेदवारावर घेतलेली हरकत मान्य झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे त्या जागी प्रकाश सावंत गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. उर्वरित 11 जागांसाठी एकूण 461 सभासद असलेल्या वरवडे सोसायटीची निवडणूकीसाठी आज 16 जानेवारी रोजी मतदान होत असून मयत सभासद व त्यांचे वारस तपास न झाल्यामुळे केवळ 250 मतदार नूतन संचालकांचे भविष्य ठरवणार आहेत.

आज सायंकाळी 4 वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर लागलीच साडे चार वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.सायंकाळी साडे पाच ते सहा वाजेपर्यंत अंतिम निकाल लागून वरवडे सोसयटीवर भाजपाच्या कोणत्या गटाची सत्ता येणार हे निश्चित होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.ए.ढवळ काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here