सिंधुदुर्ग : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध यांच्यावतीने सिंधुदुर्गातील कवयित्री तथा शिक्षिका सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ख्यातनाम साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस आणि कवयित्री ललिता सबनीस यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
डॉ.श्रीपाल सबनीस व ललिता सबनीस दाम्पत्याला राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने राष्ट्रीय सावित्रीजोति पुरस्कार माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ.सबनीस याना सत्यशोधकी पगडी बांधण्यात आली तर ललिता सबनीस यांना सावित्रीबाई महावस्त्र प्रदान करण्यात आले.
महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 27 नोव्हेंबर रोजी श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, जोतिबा यांच्याइतकेच महान कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते. विधवा ब्राम्हण स्त्रियांच्या बाळंतपणा ची जबाबदारी समाजसुधारक जोतिबांनी स्वीकारली होती.
मात्र त्या विधवा ब्राम्हण महिलांचे बाळंतपण स्वतः सावित्रीबाई यांनी केले. यातून व अशा अनेक घटनांतून सावित्रीबाईंचे महात्म्य वेळोवेळी सिद्ध झाले आहे.जोतिबा महात्मा होते तर सावित्रीबाई म्हणजे महत्याम्याची महात्मा होती.
यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संघटक डॉ. विजय ताम्हाणे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, प्रा. डॉ.संजय नगरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता झिंजूरके यांनी केले. आभार प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी मानले.