करुळ घाट चार महिने बंद राहणार रात्रीही वाहतुकीला परवानगी नाही अवजड वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा मार्गे वळविणार

0
197

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट मार्ग आहे. जीवनावश्यक वस्तू किंवा अवजड वाहतूक या मार्गावरून सरासपणे होत असते. या घाट मार्गावर मोठे मोठे खड्डे पडून घाट मार्ग अति धोकादायक बनला आहे.हा घाट मार्ग सुस्थितीत व्हावा यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली.अखेर करूळ घाट मार्ग सुस्थितीत करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. सध्या करुळ घाटातील काँक्रीटीकरण कामाच्या पूर्वतयारीचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र काम करण्यासाठी हा घाटमार्ग बंद ठेवण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली आहे. परवानगी मिळाली की घाटमार्ग बंद ठेवून अधिक गतीने काम करण्यात येणार आहे. पुढचे किमान तीन-चार महिने घाटमार्ग बंद राहणार असल्यामुळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा घाटमार्ग आहे. मात्र गेले अनेक वर्षांपासून या घाटमार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.रस्त्यावर पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्टया,धुळीचे साम्राज्य आहे.पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी यामुळे घाटमार्गातील प्रवास जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर घाटमार्गाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या घाटमार्गासह २१ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी २४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

तळेरे-वैभववाडी , नाधवडे-कोकिसरे येथे खराब झालेला रस्ता करुळ घाट असा सुमारे २१ कि.मी. रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.सध्या रस्त्याचे रुंदीकरण व रस्त्यावरील मोऱ्या, पूल यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहेत.तसेच घाटमार्गातही ज्या ठिकाणी
रस्ता अरुंद आहे त्याठिकाणी दरडी जेसीबीच्या साहाय्याने तोडून रस्ता रुंदीकरण केले जात आहे.नैसर्गिक परिस्थितीनुसार सात मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर घाट वगळता इतरत्र १० मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.अवजड व अन्य वाहतूक मोठ्या प्रमाणात कायम होते.मात्र रस्ता रुंदीकरण कामे करताना या घाटातून वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात घाटातील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून दिवसा फक्त हलक्या वाहानांना परवानगी देण्यात येणार आहे.त्यामुळे रात्री घाटमार्ग पूर्णपणे बंद ठेऊन रस्त्याच काम केलं जाणार आहे.

दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी यांचेकडे घाटमार्ग बंद
ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे.मात्र अजूनही परवानगी मिळाली नसून ही परवानगी मिळताच क्षणी घाट बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार यांनी दिली आहे.

करुळ घाटमार्ग बंद केल्यानंतर यामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग म्हणजे फोंडाघाट तसेच भुईबावडा घाटातून वळवावी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहनचालकांना काही महिने त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here