एवढ्याशा तिळावर साकारले छत्रपती शिवाजी महाराज गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची अनोखी मानवंदना

0
171

 

सिंधुदुर्ग – गवाणे ता. देवगड येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी चक्क तिळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारुन शिवजयंती निमित्ताने महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

चित्रकार अक्षय मेस्त्री आपल्या कलेतून विविध संदेश देतो. अनेकदा असंख्य महनीय व्यक्तिंना मानवंदना वेगळ्याप्रकारे त्याने दिली आहे. भारतरत्न लता मंगेशकर, दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण, पद्मश्री सिंधुताई सकपाळ, बाळासाहेब ठाकरे, भारुडरत्न निरंजन भाकरे, बिपीन रावत, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, बाबासाहेब पुरंदरे अशा व्यक्तींना आपट्याच्या पानावर, तुळशीच्या पानावर, सुपारीवर, वृत्तपत्रावर, विटांवर तर कधी तिळावर अत्यंत कमी वेळेत सुंदर चित्र साकारुन एक वेगळ्या प्रकारची श्रध्दांजली दिली आहे. यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून अक्षय याने चक्क छोट्याशा तिळावर छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत. यासाठी त्याने 3 महिने सराव केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळावर चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी त्याने ॲक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.

हे सूक्ष्म चित्र साकारायला त्याने भिंगाचा वापर केला आहे. गेल्यावर्षी 1 सेमी आकारात छोटे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारुन अभिवादन केले होते. इतके सूक्ष्म आणि तेही तिळावर साकारलेले चित्राचे पुढे काय करणार? असे विचारले असता अक्षय म्हणाला की, अतीसूक्ष्म चित्र साकारायचे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. ती मी प्रयत्नाने पुर्ण केली. तिळावरील या चित्राची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी इच्छा आहे असे अक्षय याने सांगितले. अक्षय हा आपल्या हटके आविष्कारसाठी जिल्ह्यात परिचित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here