उर्दू आणि पंजाबी साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

0
123

 

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि अशासकीय सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत आज निर्गमित करण्यात आला.

उर्दू साहित्य अकादमीवर कार्याध्यक्ष डॉ. मुशफ्फी अहमद सिद्दीक उर्फ डॉ. राणा यांच्यासह ११ अशासकीय सदस्य होते. यांच्या नियुक्त्या आजपासून रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पंजाबी साहित्य अकादमीवर कार्याध्यक्ष राजन खन्ना यांच्यासह ११ अशासकीय सदस्य कार्यरत होते. या नियुक्त्याही आजपासून रद्द करण्यात आल्या आहेत.

*नवीन नियुक्त्या लवकरच – मंत्री श्री. नवाब मलिक*

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायांच्या भाषांचा विकास करणे, या भाषांचे संवर्धन करणे तसेच या भाषेतील साहित्यिक आणि मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारीक आदान-प्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने शासनामार्फत उर्दू साहित्य अकादमी, पंजाबी साहित्य अकादमी आदींची स्थापन करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांवर त्या त्या भाषांमधील तज्ञ आणि या भाषांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या नवीन अशासकीय सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उर्दू साहित्य अकादमी, पंजाबी साहित्य अकादमी यांसह विविध अल्पसंख्याक भाषांशी संबंधीत संस्थांना पुरेसे मनुष्यबळ, भरीव निधी आणि संपूर्ण प्रोत्साहन देऊन या अकादमींचे सक्षमीकरण करण्यात येईल. या भाषांचे संवर्धन, जतन आणि विकास करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here