सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील घारपी-उडेली येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत केरळीयनांनी अतिक्रमण केल्याने स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या संबंधित केरळीयनांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.
तात्काळ कारवाई न झाल्यास ३ आॕगस्टला जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांमार्फत देण्यात आला आहे. याबाबत म्हात्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून याविषयी उद्या मंगळवार दि. ६ जुलै रोजी बैठक घेणार असल्याचे म्हात्रे याःनी सांगितले.
केरळीयन लोकांचे जमिनीवर झालेले अतिक्रमण आणि सातबारावरील आॕनलाईन त्रृटी बाबत यावेळी तहसिलदारांचे लक्ष वेधण्यात आले. घारपी-उडैली येथील सातबारा संगणकीकरण झालेले आहेत. मात्र सदर सातबारा नोंदिमध्ये आणेवारी चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. यविषयी योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
येथील काही जमिनी केरळीयनांनी खरेदी केलेल्या आहेत.उडेली येथील जमिन काही लोकांनी विक्री केलेली नाही. सदर जमिन सामायीक असून या जमिनीवर तसेच ग्रा. पं. च्या नावे असलेल्या गुरुचरण ११० एकर जमिनीवर स्थानिकांचे देवस्थान आहे. त्यावर केरळीयनांनी अतिक्रमण करून लागवड केलेली आहे.
विनापरवाना रस्ते, बंधारे, वीज कनेक्शन, खांब पुरुन संपूर्ण गावात लाईट घेतलेली आहे. सामायिक जमिनीत विक्री न केलेल्या लोकांच्या संमतीशिवाय कच्ची व पक्की घरे बांधली आहेत. सदरच्या काही जमिनी खरीपाखाली देखिल आहेत, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
ही अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे पाडण्यात यावी, असा ठराव आॕगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. मात्र ग्रामसेवकांनी परस्पर ठराव बदलून सभा इतिवृत्तामध्ये बदल केला. याविषयाकडेही शेतकऱ्यांनी तहसिलदारांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा अतिक्रमण करणाऱ्या केरळीयनांविरोधात येत्या ३ आॕगस्ट रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा गावकऱ्यांनी तहसिलदारांना दिला आहे.