आर्थिक मंदीपाठोपाठ ‘कोरोना’ची एन्ट्री झाल्याने कोकणचा राजा हापूस आंबा, काजू या ही मुख्य फळे संकटात सापडली आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ, करवंदे या उन्हाळी फळांचे उत्पन्न घटले आहे. आंबा, काजूला नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत थंड हवामान लागते. तसे नसल्याने मोहोर उशिरा आला. सध्या आंबा, काजू, जांभूळ, कोकमची फळे तयार होत आहेत. कोरोनामुळे आंबा, काजूच्या मार्केटमध्ये मंदीचा काळ आला आहे.
दरवर्षी हापूस आंबा मार्चच्या प्रारंभीच बाजारात दाखल होतो. यंदा आंब्याची पेटी सोडाच, तो झाडांवरही दिसत नाही. मार्च महिन्यात आंब्याच्या पेटीचा दर 1500 ते 2000 रुपये असतो. मेच्या प्रारंभी आंब्याचा दर 200 रुपये डझनवर येतो. हापूस परदेशात निर्यात होतो. मात्र, सध्या परदेशात निर्यातीवर बंदी आहे.
न्हावेली येथील आंबा व्यापारी बाळू नाईक यांनी सांगितले की, दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीतच आंब्याला फळ येते. आंब्याला यंदा फळच कमी आहे. त्यात कोरोनामुळे अपेक्षित दर मिळणार नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
काजूचा दर घटला
महाराष्ट कॅश्यू मन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर म्हणाले, यंदा काजू फळच कमी आहे. कलमी काजूच लागलेले नाहीत. पाऊस उशिरापर्यंत होता. त्याचा फटका बसला. आता कोरोनाचे महासंकट ओढवले आहे. एकतर काजूचे उत्पन्न कमी. त्यात आर्थिक मंदी अन् कोरोना अशा महासंकटात काजू शेतकरी, व्यापारी आहेत. काजूचा दर वेंगुर्ल्यात किलोमागे 125 रुपये, बांदा, सावंतवाडी बाजारात 130 ते 135 रुपये, केरळ, दापोलीतही घटला आहे. परदेशी काजूचा दर 90 रुपयांवर आला आहे. काजूगराचा दहा किलोच्या डब्याचा दर एक हजाराने कमी झाला आहे. आठवडय़ापूर्वी काजूचा दर आठ हजार रुपये होता. तो सात हजार झाला आहे. काजू तुकडा पूर्वी 6,700 रुपये डबा होता. तो आता 5,700 रुपये झाला आहे. त्यामुळे काजू बागायतदार चिंतेत आहेत. काजू मुंबई, पुणे, केरळसारख्या भागात जात नाही. त्यामुळे व्यापाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. काजू मार्केट पूर्णपणे ठप्प झाले आहे.
कोकणच्या मेव्यावर ‘कोरोना’चे सावट
मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत हापूस आंबा, काजू, जांभूळ, करवंदे मिळतात. याला देश-विदेशच्या बाजारपेठेतून मागणी असते. पण हवामानामुळे
ग्रहण लागले अन् उत्पादन घटले असताना आता ‘कोरोना’मुळे कोकणच्या मेव्याचे दर खालावणार आहेत. एकतर उत्पादन कमी आणि त्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ माकडे फस्त करत आहेत. त्यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत.