सिंधुदुर्ग : आंबोली घाटात पेटत्या कारमध्ये अडकलेल्या महिलेचा जळून मृत्यू, कारचालक वाचला

0
201

 

आंबोली घाटात चालत्या व्हॅगनार कारने पेट घेतल्याने आतील एका महिलेचा जळून मृत्यू झाला, तर चालक प्रसंगावधान राखून बाहेर पडला. मात्र, तो भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कार पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली. जखमी चालकाला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दाखल केले. जखमी चालक बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याची आणि मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र, या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस दोघांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे दोघे पती-पत्नी असल्याचा अंदाज आहे.

या दोघांची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांची कार दिसून आली. कारचा नंबरही मिळाला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हे दोघे आंबोलीतील हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये 16 मार्चला राहायला आले होते. ते मंगळवारी हॉटेलमधून बाहेर पडले. हॉटेलमध्ये दिलेल्या ओळखपत्रानुसार (वाहन परवाना) त्याचे नाव दुंडाप्पा बंगाराप्पा पद्मण्णावर (43) असे असून राणोजी बिल्डींग, मारुती मंदिरजवळ, भरमानगर, पीरनवाडी-बेळगाव असा पत्ता आहे. मात्र, महिलेच्या नावाची नोंद हॉटेलच्या रजिस्टरमध्ये केली नव्हती. त्यामुळे सदर महिला त्याची पत्नी आहे काय, याचा तपास पोलीस करणार आहेत.

मुख्य धबधब्याजवळ घेतला पेट

आंबोलीहून बुधवारी सायंकाळी सावंतवाडीच्या दिशेने व्हॅगनार कार येत होती. आंबोली मुख्य धबधब्याजवळ काही अंतरावर या कारने पेट घेतला. त्यात कार आगीच्या भक्षस्थानी पडली. कारमध्ये असलेली महिला तिला बाहेर पडता न आल्याने जळून खाक झाली. तर कार चालकाने कारने पेट घेतल्याबरोबर प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतली. तसेच पेट घेतलेले कपडे अंगावरून काढून टाकले. तसेच आरडाओरड केली. आपली पत्नी कारमध्ये अडकल्याचे त्याने घटनास्थळी जमलेल्या लोकांना सांगितले. लोकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने चालकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने महिलेची आणि त्याची ओळख पटू शकली नाही. तर कार पूर्ण जळाल्याने कारचा नंबर मिळू शकला नाही.

सीसीटीव्हीत कार दिसली

पोलिसांनी आंबोली दूरक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून कारचा नंबर मिळविला आहे. त्यावरून त्या कारमालकाचा शोध घेतला जाणार आहे. रुग्णालयात दाखल केल्यावर चालक आपली पत्नी कशी आहे, असे पोलिसांना विचारत होता. त्यामुळे जळून ठार झालेली महिला त्याची पत्नी असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान जखमी चालकाला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. तो 45 टक्के भाजला असून त्याचा पाय प्रॅक्चर आहे. घटनास्थळी सावंतवाडी पालिकेच्या बंबाने आग विझविली. सहाय्यक निरीक्षक अमित गोते आणि हवालदार बाबू तेली, गुरुनाथ तेली तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here