सिंधुदुर्गात भाजपाला मोठा धक्का, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ७ विदयमान नगरसेवकांचा राजीनामा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा

0
111

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची एक हाती सत्ता असलेल्या वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ७ विदयमान नगरसेवकांसह तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा भाजपा तालुकाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपला मोठा धक्का

नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर एकाच वेळी ७ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या नगरपंचायत मध्ये भाजपाचे कमल फुलविण्यात पक्षाला यश आले होते. हे सर्व नगरसेवक हातात शिवबंधन बांधणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्याला तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही दुजोरा दिला आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूक तोंडावर आली आहे.अशा वेळी एकाच वेळी ७ नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने वैभववाडीत मोठा राजकीय भूकंप झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगरपंचायतीवर भाजपची एकहात्ती सत्ता होती

वाभवे वैभववाडीचे पहिले नगराध्यक्ष रविंद्र रावराणे,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संपदा राणे, दीपा गजोबार या चार माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, हे तीन नगरसेवक तसेच भाजप वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे, दीपक गजोबार अशा एकूण १० जणांनी एकत्रितपणे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपची एकहात्ती सत्ता होती. मात्र गेल्या काही दिवसापासून या नगरसेवकांमध्ये पक्षांतर्गत धुसपूस सुरु होती.त्याचा स्फोट होऊन नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहेत.याबाबत विश्वसनीय सूञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी हे सर्व नगरसेवक मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दुजोरा दिला आहे.

भाजपाने बोलाविली तातडीची बैठक

भाजपाचे वैभववाडी प्रभारी जयेंद्र रावराणे यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलाविली आहे. आमदार नितेश राणे हे देखील जिल्ह्यात असून त्यांनीही या घटनेचा आढावा घेतला आहे. कालच जिल्ह्यात भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झाल्याने जिल्हा भाजपात उत्साहाचे वातावरण होते. आता अचानक वैभववाडी मधल्या या घटनेने भाजपाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. त्यामुळे भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आमदार नितेश राणे हे प्रकरण कसे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here