वाळू माफियांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर अंगावर ट्रक घालण्याचा प्रकार

0
199

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील मुजोर वाळूमाफिया अवैध वाळूवाहतुकीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावरच ट्रक घालू लागले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता भरधाव ट्रक मनसे पदाधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न असलदे तावडेवाडी येथे करण्यात आल्याची माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिली. सिंधुदुर्गातून परजिल्ह्यात होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकुविरोधात मनसेने आवाज उठवला. संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्याचे पाहून मनसे पदाधिकारी स्वतः पहारा देत जिल्ह्याबाहेर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडून देत आहेत. २० जानेवारी रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास मनसे पदाधिकाऱ्यांनी नांदगाव नजीक हायवेवर असलदे तावडेवाडी येथे कोल्हापूरच्या दिशेने अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्याचवेळी पकडलेल्या ट्रकच्या मागून वाळू वाहतूक करत येणाऱ्या ट्रकलाही थांबण्याचा इशारा केला. मात्र अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव ट्रक मनसे पदाधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत ट्रकसह पोबारा केला. मनसे पदाधिकाऱ्यांनी मोटरसायकलने ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक ओव्हरटेक करायला देत नव्हता. अखेर त्या ट्रकचा नंबर कणकवली पोलिसांना मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र तो ट्रक सापडून आला नाही. या घटनेवरुन मुजोर झालेले वाळू माफिया कोणत्या थराला जातायत याची कल्पना येते. अशा मुजोर वाळूमाफीयांविरोधात मनसे आवाज उठवणार असल्याचा इशारा दया मेस्त्री यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here