यावर्षी सिंधुदुर्गातील आंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव होणार सध्या पद्धतीने कोरोनामुळे यावर्षी यात्रोत्सव आंगणे कुटुंबियांपुरताच मर्यादित

0
114

 

सिंधुदुर्ग – लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव 6 मार्च 2021 रोजी साजरा होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येतात. त्यामुळे शेकडो कोटींची उलाढाल होत असते.

आपण आहेत तिथूनच भराडी देवीला आपले सांगणे सांगा

देश-विदेशातील भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात यात्रेची. हा यात्रोत्सव कोणत्याही तिथी अथवा तारखेवर होत नाही, तर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. विविध क्षेत्रांतील अनेक महनीय व्यक्ती या यात्रोत्सवास उपस्थिती दर्शवितात व देवीचे आशीर्वाद घेतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवास उपस्थिती दर्शविणाऱ्या व्यापाऱ्यांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना या यात्रोत्सवास आपली हंगामी स्वरुपाची दुकाने उभारता येणार नाहीत. भाविकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच आपण जेथे आहात, तेथून देवी भराडी मातेस आपले सांगणे सांगावे, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असे आवाहन भाविकांना आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अंगाने कुटुंबीयांपुरताच मर्यादित असेल यावर्षीची यात्रा

प्रतिवर्षी दीड दिवस होणा या यात्रेत लाखो भाविक उपस्थिती दर्शवितात. यात देश-विदेशातील भाविक, व्यापार-राजकीय-सामाजिक कला-क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर या यात्रोत्सवात भराडी मातेच्या दर्शनासाठी येतात. गतवर्षी सुमारे बारा लाख भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळीही ही भाविकांची अशीच गर्दी होण्याची शक्यता असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांनी हा यात्रोत्सव आंगणे कुटुंबियांपुरताच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेऊन विधीवत धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळी आंगणेवाडी यात्रोत्सवाची तारीख आणि जत्रेच्या स्वरुपाबाबतची माहिती जाहीर केली.

कोरोना पार्श्वभूमीवर कोटींच्या उलाढालीला प्रथमच ब्रेक

आंगणेवाडी देवी भराडी मातेचा यात्रोत्सव म्हटला, की शेकडो कोटींची उलाढाल होत असते. यात्रोत्सव पूर्व महिनाभर व्यापाऱ्यांची लगबग सुरू झालेली असते. आंगणेवाडी यात्रा पूर्वी लाखो चाकरमानी भाविक आंगणेवाडीमध्ये येतात. प्रशासनाच्याही बैठकांमध्ये यात्रा नियोजन पार पडते. भाविकांना विविध सोयीसुविधा आणि मातेचे लगेच दर्शन व्यवस्था यासाठी आंगणे कुटुंबियही अनोख्या पद्धतीने प्रतिवर्षी नियोजन करतात. परंतु, यावेळी मात्र या सर्व बाबींवर कोरोनाचे सावट असल्याने ब्रेक लागणार आहे. यात्रेचे स्वरुप यावर्षी मर्यादित असले, तरी कोणीही भाविकांनी नाराज न होता, भराडी मातेचा धावा आपण असलेल्या ठिकाणांवरून करावा. आई भराडी माता सर्व भक्तांच्या हाकेला धावून जाईल व त्या सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करील. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करूनच साध्या पद्धतीने आंगणे कुटुंबियांपुरता मर्यादित यावर्षीचा यात्रोत्सव पूर्ण होणार असल्याची माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here