मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, एक डिसेंबरला शिवाजी पार्कवर शपथविधी होणार

0
114

 

येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे.

ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शपथविधी सोहळयासाठी महापालिकेला तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. 1 डिसेंबरला शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आधीपासून होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले. शरद पवार यांच्या सूचनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं

गेल्या महिन्याभरापासून सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधातच बंड पुकारलं होतं. मात्र अखेर हे बंड थोपवण्यात शरद पवार यांना यश आलं. तीन दिवसात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here