मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचे काम सुरू असून या महामार्गावरील सर्वात कठीण असलेला घाट रस्ता म्हणजे कशेडी घाट. कशेडी घाटाचा वळणा-वळणाचा धोकादायक 20 किलो मीटरचा घाटरस्ता पार करताना प्रवाशांना 45 मिनिटे लागतात. मात्र, कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून एप्रिल 2021 पर्यत या भुयारी बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे या बोगद्यातून प्रवास करणे सुखकारक आणि धोका विरहीत होऊन पंधरा ते वीस मिनिटात प्रवाशी कशेडी घाटचा पर्यायी मार्ग पार करू शकतो.
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्याचे काम संथगतीने सुरू असले तरी इंदापूरपासून पुढील दुसऱ्या टप्याचे काम जोरदार सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गात पोलादपूर ते खवटी या 20 किमी रस्त्यात कशेडी घाट लागतो. कशेडी हा धोकादायक घाट असून वळणावळणाचा रस्ता आहे. त्यामुळे अनेक अपघात नेहमी होत असतात. अपघातामुळे अनेकांचे प्राण जाऊन जखमी होण्याचे प्रमाणही जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे व रस्ता खचण्याचे प्रकार कशेडी घाटात होत असतात. महामार्गाच्या चौपदरीकरणांच्या कामात कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून 441 कोटींच्या दोन भुयारी बोगद्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सर्वेक्षण पूर्ण केले असून भुयारी बोगद्याचे काम सुरू झाले आहे. या भुयारी बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. रायगड हद्दीतील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाच्या हद्दीतून हा बोगदा तयार करण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावाजवळ निघत आहे. हा भुयारी बोगदा पावणे दोन किमीचा आहे.भुयारी बोगद्याच्या कामासाठी 200 मजूर वेगवेगळ्या गटाद्वारे काम करीत आहेत. या भुयारी बोगद्याच्या कामासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात येत आहे. दोन स्वतंत्र बोगदे असून यामध्ये सहा मार्गिका असणार आहेत. ऑक्टोबर 2018 पासून या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून एप्रिल 2021 पर्यत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा कमी वेळेत आणि सुखकारक होणार आहे. या भुयारी बोगद्यामुळे अपघाताचे प्रमाणातही घट होणार आहे.