मला कोणी अटक करू शकले नाही, मी “सरेंडर” झालो नितेश राणे; ज्यादिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास होईल…

0
134

 

सिंधुदुर्ग – मला कोणी अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो, अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपचे युवा नेते नितेश राणे यांनी आज सावंतवाडी येथे दिली. दरम्यान थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास होईल हे मात्र निश्चित, असाही टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, मी कधीही फरार झालो नव्हतो. पोलीस ज्या ज्या वेळी मला बोलवत होते त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर हजर राहून त्यांना सहकार्य करत होतो. त्यांना हवी ती माहिती देत होतो. आतापर्यंत सहकार्य केले आहे. तसेच यापुढे देखील करणार आहे. असे सांगताना आपल्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही ज्या पद्धतीने अडविण्यात आले, पोलिसांनी माझी गाडी थांबवून ठेवली, आमच्या कार्यकर्त्यांवर सहकार्‍यांवर ज्या केसेस घालण्याचा प्रयत्न झाला, हे फारच चुकीचा आहे. मी विधिमंडळाचा सदस्य आहे. लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे मला जबाबदारीची जाणीव आहे. माझ्या जिल्ह्यातील लोकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता मी न्यायालयात शरण आलो होतो. मला आज पर्यंत पोलिस अटक करू शकलेले नाहीत. या नंतर मला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर आज पर्यंत मी न्यायालयीन कोठडीत होतो. माझी तब्येत बिघडली म्हणून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु माझ्या तब्येतीबद्दल देखील अनेक विषय बाहेर चालू होते. आता मी इथून गेल्यावर आमच्या एस एस पी एम मेडिकल कॉलेज मध्ये उपचार घेणार आहे. आजही मला तब्येतीचा त्रास होत आहे. मला पाठीचा आणि मणक्याचा त्रास होत आहे. आता तो अधिक वाढलेला आहे. ब्लडप्रेशर आणि शुगरचाही मला त्रास होतो आहे. माझी शुगरलो होते आहे. त्यामुळे अधिक उपचार घेण्यासाठी मुंबईला देखील जाणार आहे. मला राजकीय आजार आहेत. असे माझ्यावर जे आरोप होत ते मी शासकीय रुग्णालयात दाखल होतो त्या ठिकाणी जे काही माझ्या रिपोर्ट येत होते ते चुकीचे होते काय ? अशाप्रकारे एखाद्याच्या तब्येतीविषयी टीका-टिप्पणी करणे कुठच्या नैतिकतेत बसत ? असा प्रश्न देखील आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.

जेव्हा सरकार पडायची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया चालू होतात, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात ? हा प्रश्न आम्ही विचारायचा का ? लतादीदींच्या अंत्यविधीच्या वेळी मुख्यमंत्री कोणताही बेल्ट न घालता उपस्थित राहतात, मात्र अधिवेशनाच्या काळातच ते आजारी का पडतात ? आता दोन दिवस प्रकृतीबाबत काळजी घेऊन आराम केल्यानंतर गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने टाकली आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यासोबतच मुंबई नगरपालिका निवडणुकीबाबत जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे तिथेही लक्ष घालणार आहे. या सगळ्या नंतर मी सविस्तर बोलणारच आहे. आणि ज्यादिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास होईल असे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here