निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा आरोप

0
109

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील मालवण किल्ल्याच्या डागडुजी साठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. किल्ल्यातील पाणी योजनेसाठी 5 कोटी आणि शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दीड कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला असल्याची माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली. तर निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

किल्याच्या डागडुजीचे काम करणार

शिवजयंती निमित्ताने आज आमदार वैभव नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी किल्याच्या डागडुजी करता राज्य सरकार कडून ठोस निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले.

निलेश राणे स्टंटबाजी करतात

माजी खासदार निलेश राणे हे केवळ स्टंटबाजी करतात अशी टीका त्यांनी यावेळी केली. निलेश राणे यांनी हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा मी मालवण किल्ल्यावर येतोय असे आव्हान दिले होते. त्यावर ते बोलत होते.

किल्ल्यातील नळयोजनेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद

किल्ल्यातील नळयोजनेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवराजेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. तर लवकरच नलयोजना पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदीरात शिवाजी महाराजांना जिरेटोप अर्पण केली. यावेळी ढोलताशांचा गजर आणि महाराजांच्या जयघोषाने सिंधुदुर्ग किल्ला दुमदुमून गेला होता. राज्यशासनाने मनाई आदेश जारी केला असून कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आपण शिवजयंती साजरी करत असल्याचं यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

निलेश राणेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांनी रोखली रॅली

मालवनमध्ये देऊळवाडा ते मालवण किल्ला जेठी पर्यंत मोटारसायकल रॅली काढत निलेश राणे यांनी यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मालवण एसटी बसस्टँड पूर्वी पोलिसांनी निलेश राणे यांची रॅली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चर्चेतून ही रॅली शांततेत पुन्हा सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here