नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी बाबत ग्रामविकास मंत्री सकारात्मक, जिल्ह्यातील पक्षबांधणी बाबतीतही समाधानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कागल येथे घेतली हसन मुश्रीफ यांची भेट, जिल्ह्याच्या विकासावर केली चर्चा

0
119

 

सिंधुदुर्ग – देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीला तात्काळ मंजूरी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पक्षबांधणी होत आहे. अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह पक्षाचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष सागर वारंग, शहराध्यक्ष संदेश मयेकर, कोल्हापूर मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रानोजी चव्हाण यांनी आज कागल येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायत सह जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाली.

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी यावेळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन सादर करतात नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती करावी अशी मागणी केली. तसेच ग्रामपंचायत मागणी बाबतचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याला प्राप्त झाला असून त्यामधील त्रुटी देखील आम्ही पूर्ण करून दिलेल्या आहेत असेही अनंत पिळणकर यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना सांगितले. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नामदार हसन मुश्रीफ यांनी ही ग्रामपंचायत निर्मितीची मागणी तातडीने पूर्ण केली जाईल अशा शब्दात आश्वासित केले आहे.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. कणकवली तालुक्यातल्या कलमठ गावात एका शेतकऱ्याच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाबाबत कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी ग्रामविकास मंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश दिले जातील आणि हे अतिक्रमण तातडीने हटविले जाईल असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी, विशेषता ग्रामीण भागातील विकासाकरता निधी द्यावा अशी मागणी केली. याबाबत देखील सकारात्मक प्रतिसाद देत हसन मुश्रीफ यांनी निधी देण्याचे मान्य केले.

याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या संघटना बांधणी बाबत विशेष चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात पक्ष वाढी संदर्भात काय करता येईल आणि काय केले पाहिजे या अनुषंगाने देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना केल्यात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी चांगल्या पद्धतीने होत आहे, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुकही केले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीकरता जी काही मदत लागेल ती आपल्याकडून केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here