झाला लोकोत्सवाचा गजर!

0
381

 

ढोलांच्या नादाने गाव दुमदुमून जातो.. ग्रामदेवतांच्या नावाचा जयघोष सुरू होतो. चव्हाटयावरचा शुकशुकाट, माणसांनी गजबजून जातो. दिवसाची चव्हाटयावर गजबज तर रात्री मांडावर लोककलांचा फड रंगतो. तमाशात पुरुष पात्रच नाचा होतो. गवळण, गण आणि सोंगे उत्तर रात्रीपर्यंत रंगत जातात. रात्री मग मांडावरूनच चव्हाटयापर्यंत दिंडी निघते. रोंबाट सुरू होते. गावातल्या होळीचा असा हा थाट शहरवासीयांना अनुभवता यायचा नाही. येथे एक कल्पकता असते, एकरूपता असते आणि श्रद्धेची पताका प्रत्येकाच्या मना-मनात गुंजन घालत असते.

..नेरूरचे रोंबाट, कुणकेरीचा आगळावेगळा हुडोत्सव, गोव्याजवळील साळगावचे गडे, कारिवडे-माडखोलचे खेळे असे आणखीन बरेच काही. कुडाळ तालुक्यातील आकेरी या गावाने अशीच एक पाच दिवसांच्या होळीत प्राचीन कालापासून ‘सती’ची परंपरा जपली आहे. आगळीवेगळी अशी ही पंरपरा पहाटेच्या वेळी साजरी केली जाते.

शिमगोत्सवातील समस्त आकेरीवासीय ऐन साखरझोपेत असताना काळोखाच्या भयाण शांततेत रातकिडय़ांच्या किरकिरीत सती जाणारी सुहासिनी, तिच्याभोवती जमलेले रोंबाटकरी, त्यापुढे ढोल-ताशे बडवणारे वाजंत्री शोकगीतांची आळवणी करत वातावरण शोकाकुल करणारे काही जुनेजाणते वृद्ध, एका बाजूला धगधगणारे दोन गड, तर दुस-या बाजूला सती जाणा-या सुहासिनीच्या गडाचा पहारा करता करता मेलेल्या नव-याची अगदी चितेप्रमाणे भासणारी कवळाची पेटती आग हा सर्व प्रकार या सतीच्या स्थळी पहाटे उपस्थित राहून पाहिल्यास अंगावर काटा उभा राहतो.

भल्या पहाटे जाते सती!

आकेरी-घाडीवाडी लगत गावातील सर्वानी एकत्रितरीत्या जमून होळीउत्सव साजरा करण्यात येणारा ‘चव्हाटा’ असून या चव्हाटयावर होळी पौर्णिमेस भेडल्या (सूर) माडाची उंचच उंच होळी घातली जाते. होळीलगत स्थापना केलेल्या घटात गावठी दारू ओतून बळी देऊन त्याचा रक्ततिलक या घटाला लावला जातो. या घटाजवळील परिसरात होळीच्या चवथ्या दिवशी उत्तररात्रीनंतर पाचव्या दिवशी पहाटे ४ वा. च्या दरम्याने सती कार्यक्रम सुरू होतो. या कार्यक्रमाची खरी सुरुवात घाडी, गावडे, डामरेकर, परब, सावंत, लंगवे, राऊळ या सात प्रमुख रोंबाटकरांच्या मांडावर पहाटे ३ वा. ढोल जोरजोरात एका विशिष्ट लयींत वाजवून ‘भली रे’ अशी बोंब मारून होते. हे प्रत्येक रोंबाटकरी ढोल वाजवत तासाभरात चव्हाटयावर हजर होतात. सर्वप्रथम येथे असलेल्या जुनाट चिंचेजवळ व भल्या मोठया दगडावर शेणींनी मोठा विस्तव केल्यानंतर गड पेटवणे-राखणे हा कार्यक्रम सुरू झाला. यात गावडे समाजातील दोघे जण हातात पेटत्या चुडी घेऊन हरहर महादेव असा घोष करत चव्हाटयाच्या दोन्ही बाजूला उभे राहून एकमेकांकडे तोंड करून धावत सुटतात.

गड म्हणून यावेळी चव्हाटयाजवळील चिंचेजवळ व तिच्या बाजूला असलेल्या भल्या मोठया दगडावर शेणाच्या गोव-या रचून गड बनवला जातो. हे धावणारे गडे या गोव-यांनी बनवलेल्या गडाकडे एकत्र होतात. यातील दोघे जण दगडावरील तर उर्वरित दोघे चिंचेजवळील गडाकडे थांबतात व या गडांना आग लावली जाते. घटासमोर समाजाचे नेतृत्व करणा-या गावच्या गावकारास हिरवी साडी नेसवून, सुगंधी फुले त्याच्या केसांत खोवून त्याच्या हातातील ताटात ओटीचे साहित्य देऊन या सुहासिनीला सर्व रोंबाटकारी ढोलताशे जोरजोरात वाजवत या धगधगत्या गडांकडे हळूहळू चालत आणतात. त्यावेळी गडावर उपस्थित असलेले चारीही गडे एकमेकांवर या जळत्या गोव-या फेकतात.

एकमेकांना जखमी किंवा भाजून निघण्याचा शर्थीचा प्रयत्न केला जातो. ‘हरहर महादेव’ अशी गर्जना करून गड लुटीचे हे डावपेच सुरू असतात. या ठिकाणी या सुहासिनीला आणून हा धगधगता गड दाखविला जातो. या गडाच्या विरुद्ध दिशेला सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर पालापाचोळा असलेली सुकी झाडे (कवळा) आणून ठेवली जातात. ती व्यवस्थित चितेप्रमाणे रचून त्याला गावडे आग लावतात. सती जाणा-या या सुहासिनीस चव्हाटयास प्रदक्षिणा घालून वाजतगाजत गडांकडून या कवळाच्या पेटविलेल्या चितेजवळ आणले जाते. हे सरण दाखवून सती झालेल्या ‘गावकारास’ सरणाभोवती रोंबाटका-यांच्यामध्ये घेऊन पाच प्रदक्षिणा घातल्या जातात.

प्रदक्षिणा घालताना उपस्थितांतून शोकगीतांची आळवणी होते. सरणाशेजारील उंच भागावर या सुहासिनीला उभे केल्यानंतर ही सुहासिनी पेटत्या सरणात सर्वप्रथम हातातील ओटी टाकून सरणाच्या आगीच्या ज्वाळांवरून पलीकडे उडी घेत चितेकडे फिरून न बघता सती झालेली व्यक्ती काळोखातून घरी पसार होते. चितेभोवती हातात पालापोचाळयाने युक्त सुकी (कवळे) घेऊन उभे असलेले सगळे रोंबाटकारी ही कवळे चितेवर टाकतात. सर्व रोंबाटकारी आपापल्या मांडावर परत चव्हाटयावरून जाण्यास निघतात.

यावेळी पहाटेचे ५.३० वाजलेले असतात. ज्या सुहासिनीने उडी घेतली त्या ‘गावकारास’ सती असे संबोधले जाते. येथेच या ‘सती’ कार्यक्रमाची सांगता होते. या सतीबद्दल ऐकायला मिळणारी आख्यायिका अशी प्राचीन काळी या जागी असलेल्या दोन किल्ले-गडांचा राखणदार होता गावडे समाजातील गडक-यांचे या गडांवर वास्तव्य होते. अचानक शत्रूंकडून या गडांना वेढा देऊन शत्रूपक्षाकडून गड सर करण्याच्या प्रयत्नात या गडाचा रखवालदार लढता-लढता मरण पावला.

शत्रू पक्षाचा गड काबीज करण्याचा प्रयत्न या गडांवरील ‘गावडे’ गडक-यांनी ब-याच प्रयत्नांती हाणून पाडला. शत्रूपक्षाच्या ब-याच जणांना धारातीर्थी पाडून अखेर गावडेंनी हा हल्ला परतवून लावला. मात्र, गडाच्या रखवालदारास त्यांना मुकावे लागले. या रखवालदाराच्या अंत्यविधीवेळी ढोलताशे वाजवत त्याच्या या शौर्याबद्दल गावातून अंत्ययात्रा काढून त्याची चिता रचण्यात आली. त्याच्या पत्नीला ही वार्ता कळवून ती आस्तिक पतिव्रता देवावर अढळ श्रद्धा असल्याने तिने आपल्या नव-याच्या चितेत सती जाण्याची इच्छा प्रकट केल्याने या रखवालदाराच्या पत्नीच्या गडावरील गावडे नामक गडक-यांनी इच्छेची पूर्तता केली तीच ही ‘सती’ जाते.

आच-यात भरते संगीतगाणं..

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या संस्थान आचराची होळी उत्सवही असाच अनोखा समजला जातो. येथे होळी दिवसापासून रामेश्वर मंदिरानजीकच्या रवळनाथ मंदिरासमोर मांड सुरू होतो. वेगळया धाटणीच्या गीतांसोबत सोंगांच्या संगे.. हा मांड रंगतो. येथे म्हटल्या जाणा-या गाण्यांना रागधारीचा साज असतो. शिमग्यात म्हटल्या जाणा-या पारंपरिक गाण्यापेक्षाही या गाण्यांचा ठेका आणि चाल अनोखीच असते.

गणपती देव भजा तुम्ही हा
सकल गुणात्मज भक्त सखा तो
झडकरी येई घणा कृपा घणा ।।

या गाण्याने गाणे संपल्यानंतर सोंग्या धावतच खाल्यान.. खाल्यान.. ओरडतच सोंग घेऊन येतो आणि मग सवाल जवाब सुरू होतात.

पेटकरी : अरे तुका कोणी खाल्यान?
सोंग्या : रे मेल्या माका मोठयान खाल्ल्यान
पेटकरी : मोठयान म्हणजे कोणी? मानक-यान काय?
सोंग्या : रे मेल्या तेच्याय पेक्षा मोठयान.
पेटकरी : देवचारात काय?
सोंग्या : नाय मेल्या तेच्याय पेक्षा मोठयान.

सवाल जवाबात गावातल्या प्रतिष्ठित माणसांनी खाल्यांनी काय विचारतच शेवटी सोंग्याच्या ‘‘मेल्या ‘पुशयेन’ खाल्यान या उत्तराने सगळे हसतच सोंग संपते.

प्रत्येक गाण्यानंतर येथील अवली पोरे सोंगे आणतात. यात वर्षभरात घडलेल्या घटना, देव काढणे अशा काल्पनिक देवासमोर गावातील काही लोकांच्या समस्या विचारत त्यावर देवाकडून मिळणारे मार्मिक टिपण्णीतून उत्तर लग्न समारंभ होडीतून नवरा नवरीला नेण्याचा प्रसंग या सोंगातून मुले उभे केले जातात.

पारधीचे पोस्त!

शिगम्यातली रंगत आता कमालीची वाढली आहे. अनेक भागात शबयचे सूर निनादू लागले आहेत. गावागावात चव्हाटयावर देव पोहोचले आहेत. देवतांची तरंग काठी गाववासीयांना आशीर्वाद देण्यासाठी परंपरागत प्रथांमध्ये व्यस्त आहेत. चव्हाटयावर आलेल्या देवांमुळे गावात एक नवा उत्साह संचारला आहे. या शिमगोत्सवात देवतांच्या स्वारीचा मुक्काम गावांमध्ये होणा-या पारधीवर ठलेला असतो. ही पारधीची परंपरा साद्रीतल्या अनेक गावात आहे. चव्हाटयावरचे पोस्त म्हणजे एक वेगळीच लज्जत असते.

देवाला साक्षी ठेऊन जंगलात रान काढण्यासाठी गावातील मंडळी रवाना होतात. वन्य कायद्याप्रमाणे जंगलातील शिकार करणे हा गुन्हा असला तरी परंपरा टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जातो. या मागची भूमिका शुद्ध असते. गावाचा एकोपा टिकावा, समस्त गाव एखाद्या दिवशी तरी या पोस्ताच्या निमित्ताने एकत्र व्हावे.शिकार म्हणून एखादाच पशु मारावा. पुन्हा अशा पद्धतीने शिकार करू नये, हाही गावाचा एक दंडक असतो.

सृष्टीचक्राप्रमाणे जंगलातील पशुंची संख्याही मर्यादीत रहायला हवी, जंगल शेजारी असलेल्या शेतीची नासधूस या प्राण्यांकडून होऊ नये हीच यामागची भूमिका असते. चव्हाटयावर देवाचे तरंग पोहोचल्यावर शिमगोत्सवाचा एक दिवस जंगलात जाण्यासाठी निश्चित केला जातो. एरव्ही जंगलात जाताना झाड तोडू नये, फांद्या मोडू नयेत. एका पशु पेक्षा अधिक कोणावरही बंदूक चालवू नये अथवा अन्य कोणत्याही हत्याराने मारू नये, असा अलिखित रिवाज आहे.सहयाद्रीच्या घनगर्द झाडीत शिकार मिळत नाही असे कधी होत नाही.

तर ठरलेल्या दिवशी शिकारीला जाणे एक मजा असते. नियोजित ठिकाणी जंगलातच तळ टाकला जातो. येथे जेवणखाण्याची व्यवस्था केली जाते. जंगलात जेवण करताना मिळणारा आनंद हा पंचपक्वान्नाच्या आनंदापेक्षाही अधिक असतो. हे सर्व होत असतानाच दुसरीकडे हाकारे-कुकारे सुरू होतात. रान काढले जाते आणि शिकार पडतेच.
ही शिकार मग वाजत गाजत चव्हाटयावर आणली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते.गुलाल उधळला जातो, गावागावात असलेल्या मांडांवर दर्शन सोहळा होतो आणि पारध चव्हाटयावर पोहोचते. या सावजाचा मांसाहारी प्रसाद गावातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होतो.

पोस्ताची दवंडी शिकार झाल्या झाल्या वाडीवस्तीवर असलेल्या मांडांवर दिली जाते. पोस्ताची वेळ निश्चित करण्यात आलेली असते. पोस्त म्हणजे गाववासीयांनी एकत्र यावे आणि प्रसाद घ्यावा, हे ठरलेले. पोस्तासाठी रानातीलच पाने निवडली जातात. चांदवड, कुडा अथवा पळस याची रास लागते. या पानांवर मटण आणि भाकरी वाढली जाते. देवाचा प्रसाद म्हणून सर्वजण सेवन करतात. लांबच्या लांब पंक्ती बसतात आणि मग मटण आणि भाकरी प्रत्येकाला वाढली जाते. देवाचा प्रसाद म्हणून हे पोस्त श्रध्देने स्वीकारले जाते. पोस्ताच्या निमित्ताने अख्खा गाव एकत्र होतो.

मोबाईलच्या जमान्यात चव्हाटयावरची गर्दी कमी झाली असली तरी, परंपरा मात्र आजही टिकून आहे. या परंपरेमागचे विज्ञान लक्षात घेता, सामाजिकतेतून विचार करता गावची चौकट चव्हाटयावरच ठरते. एकीचा वारसा जपणारा आणि प्रत्येकाला आत्मविश्वास देणारा हा उत्सव समस्त गाववासीयांना वर्षभराची एक शिदोरीच बहाल करणारा ठरत आहे. आता तर ऊत्सवाचा प्रत्येक भाग टीपण्यासाठी यावर्षी मोबाईलवर रेकॉर्ड करणारे हातच अधिक दिसत होते.

साळच्या ‘गडय़ांचे गूढ’!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरालगतच्या साळ (गोवा) या सीमावर्ती भागातील गावातल्या गडे उत्सवाचे गूढ व उत्सुकता आजही बदलत्या जमान्यात अगदी जैसे थे आहे. दोडामार्गालगत अवघ्या चार कि. मी. वर वसलेले ‘साळ’ हे गाव गोवा राज्याच्या हद्दीत येत असले तरी त्याची नाळ जणू दोडामार्गशी कित्येक वर्षे जोडली गेली आहे. नदीकाठालगत वसलेले व शेती बागायती सोबत आर्थिकदृष्ट्या सुजलाम- सुफलाम म्हणुन या साळ ची वेगळी ओळख आहे. या गावामध्ये श्री महादेव, श्री देवी भूमिका पंचायतन ही देवस्थाने पुरातन आहेत. याच भागातले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडे उत्सव.. साळ मधील या गडे उत्सवाला चारशे- साडेचारशे वर्षाची परंपरा आहे.

या उत्सवाला सुरूवात होते ती होळी पोर्णिमेच्या दुस-या दिवशी मध्यरात्री १२ वाजता! मग रात्रभर, पहाटे पाचपर्यंत हा उत्सव चालतो. या उत्सवादरम्यान गावातील रहिवाशांपैकी ६४ तर कधी ४० व्यक्तींवर संचार येतो. हे ६४ किंवा ४० मानकरी म्हणजेच गडे. त्यांचा पेहराव नेहमीचाच. धोतर, कमरेला पट्टा आणि बनियन असा.. मध्यरात्री सर्व गड्यांना देवीचे तीर्थ दिल्यानंतर हे गडे नजीकच्या जंगलाकडे एकापाठोपाठ जाऊ लागतात. प्रथा अशी आहे की, ढोलकी वाजू लागते..

पहिला गडा या वाजंत्र्याच्या हाताला पकडून डोंगराच्या उंच टेकडीवर धावू लागतो. आवाजाचा वेध सर्वानाच घेता येतो. पहिल्या रात्री करूले पकडण्याचा कार्यक्रम असतो. करूले म्हणजे स्मशानात उत्तरकार्यासाठी वापरतात तेवढया आकाराचे मातीचे भांडे! मात्र हे करूलेही पळत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. देवचार म्हणजे देव नव्हे. एखाद्या क्षेत्राचा किंवा संबधित जागा- परीसराचा राखणदार म्हणजेच देवचार. हे गडे जंगलात जाऊन रात्रीच्या अंधारात हे करूले जमा करत असताना एक किंवा दोन गडे ‘देवचार लपवून ठेवतो’ अशी श्रद्धा आहे, आणि भावनाही. त्या दरम्यान भाविकांना देवचाराने दर्शन द्यावे, यासाठी आगीची चूड दाखवली जाते. ही चूड उलटसुलट फिरवत फे कली जाते. त्यामूळे एका चुडीबरोबर तीन – चार चुडी पळताना दिसतात. हे दृश्य चित्तथरारक असेच! ते पाहण्यासाठी हजारो भाविक साळमध्ये दर शिमगोत्सवात येत असतात.

दुस-या दिवशी हे गडे रात्री १२ वाजता ठरलेल्या होळीकडे येतात. देवीचे पुन्हा एकदा तीर्थ घेतल्यानंतर पहिल्या रात्री लपवलेल्या गडयांना आणण्यासाठी हे सगळे गडे जंगलात जातात. त्यांना नेण्यासाठी देवचार ह्यअदृश्य रूपाने होळीकडे येतो, असे मानले जाते. त्यांना घेऊन गेल्यानंतर उंच टेकडीवर लपवलेल्या अगोदरच्या गडयांना देवचार या गडयांकडे सुपुर्द करतो.

मात्र लपवून ठेवलेला गडे पूर्णपणे बेशुद्धावस्थेत असतात. त्यांना चार गडे आपल्या खांद्यावरून होळीकडे आणतात. येथे त्यांना भूमिका देवीचे तीर्थ दिले जाते. त्याला शुद्धीत आणण्याची परंपरा ही वेगळी आहे. दोन गडे हातात हात घालून होळीभोवती फे -या मारतात. हळुहळु शुद्धीवर आलेल्या त्या गडयांवरही संचार येतो. आणि उंच उडी मारून तो ही नाचू लागतो. बाकीच्या गडयांना घेऊन लपवून ठेवलेल्या गडयांच्या शोधार्थ सर्वजण पून्हा रवाना होतात. तेथे झाडावर लपवून ठेवलेल्या गडयालाही अन्य गडयांच्या सुपूर्द केले जाते. या दरम्यान देवचार व गडयांमध्ये रस्सीखेचही होते असे सांगितले जाते.

गडा दिल्यानंतर त्या जागी मोठी मशाल पेटते. अशा तीनचार मशालींचे दृश्य दिसू लागते .हे दृश्य पाहण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या – झुंडी अक्षरश: धावत पळत असतात.तिस-या दिवशी म्हणजेच अंतिम रात्री हे सर्व गडे स्मशानात जातात. हा मार्ग लोकवस्तीतून जात असल्याने सर्वजण घराचे दरवाजे बंद करतात. गडे सरणावरील लाकडे, मडकी, पांढरे कापड व अन्य वस्तू होळीकडे आणतात.

मात्र या वस्तू गडयांना देण्यास मशाणातील आत्मे नाखूष असतात म्हणुन गडे या वस्तू नेत असताना मोठयाने चित्र विचित्र आवाज येवू लागतात असे जाणकार सांगतात. या तिन्ही दिवशी ढोलताशे यांचा गजर आणि नमनाचा कार्यक्रम सुरु असतो. या नमनात गोव्यापासून सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतील सर्व देवांचे काव्यातून नामस्मरण करून त्यानाही उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली जाते.विशेष म्हणजे होळीत होणा-या या उत्सवाच्या तिन्ही रात्री सर्व गडे अनवाणी गावाच्या सीमेवर, जंगलभर फि रत असतात. गडयांची वये १६ वर्षापासून ६० वर्षापर्यंत .. पण ह्यसंचार आल्यावर एखादया वृद्ध गडाही तरूणासारखा धावू लागतो. ह्यगडा नसलेल्यांना या तीन दिवसांत मध्यरात्री बारानंतर गावाच्या सीमेबाहेर जाता येत नाही.तसे सीमे बाहेर कोणी जाऊ नये असा रिवाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here