जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यासाठी 12 रुग्णवाहिका घेणार जिल्ह्यात चार ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रीयागृह उभारणार – पालकमंत्री उदय सामंत

0
106

सिंधुदुर्ग – 15 जिल्हा खनिकर्मच्या निधीतून जिल्ह्यासाठी एकूण 12 रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, महिला रुग्णालय, कुडाळ, ग्रामिण रुग्णालय वेंगुर्ला आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली अशा चार ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर) उभारण्यास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज मंजूरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली खनिज प्रतिष्ठान, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण, कोविड आजार आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या विषयांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पालकमंत्री श्री. सामंत यांनी खर्चास मान्यता दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. पाटील, जिल्हा उद्योग अधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक, नगर प्रशासन अधिकारी श्री. साबळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, आंबोली, मालवण तालुक्यातील हिवाळे, मसुरे, कुडाळ तालुक्यातील माणगाव, कणकवली तालुक्यातील खारेपाटण आणि फोंडा, देवगड तालुक्यातील फणसगाव, वेंगुर्ला तालुक्यातील तुळस व आडेली या आरोग्य केंद्रांना एकूण 11 रुग्णवाहिका आणि जिल्हा रुग्णालयासाठी एक कार्डिॲक रुग्णवाहिका अशा एकूण 12 रुग्णवाहिका जिल्हा खनिकर्म निधीतून देण्यास मान्यता देऊन पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यात चार ठिकाणी अत्याधुनिक असे ऑपरेशन थिएटर उभारण्यात यावे. त्यासाठीच्या 7 कोटी 50 लक्ष रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात येत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड लॅबसाठी आणखी एक आरटीपीरसीआर मशीन खरेदी करण्यात यावी. खनिकर्म अधिकारी यांनी खनिज उत्खननामुळे प्रत्यक्ष बाधित व अप्रत्यक्ष बाधित गावांची यादी तयार करावी, त्या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, रस्ते, पाणी यांच्या विकासाचा एक आराखडा तयार करून त्या प्रमाणे निधीचे वितरण करावे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढवण्यावर यंत्रणेने भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्राधिकरणासाठी मंजूर झालेल्या 25 कोटी निधी पैकी साडे आठ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 99 लाख, रस्ते दुभाजकांसाठी 84 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सर्कलचे सुशोभीकरण, पुतळा सुशोभीकरण, टाऊन पार्क, चिल्ड्रन प्ले, विरंगुळा केंद्र, दाबाचीवाडी सुशोभिकरण, प्रवेशद्वार उभारणे, व्यायामशाळा उभारणे यासर्व गोष्टींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्राधिकरण हे जिल्हा मुख्यालय म्हणून सुंदर आणि आदर्श असे व्हावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाविषयीच्या बैठकीमध्ये या योजनांमध्ये जास्तीत जास्त गरजू लोकांना फायदा व्हावा या दृष्टीने काम करावे असे आदेश देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, बँकांनी याबाबत लवचीक दृष्टीकोन ठेवावा. जास्तीत जास्त लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाखेने किमान 2 प्रस्ताव मंजूर करावेत. निवास न्याहरि व काजू प्रक्रिया उद्योगांवर भर देण्यात यावा. पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसायाची निर्मिती व्हावी. 1 मे पर्यंत किमान 200 लोकांना कर्ज मंजूरीचे आदेश देण्यात यावेत असा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी या सर्वच विभागांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच जलसंवर्धनाच्या कामांचाही सविस्तर आढावा येवेळी घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here