जांभळाची क्‍लस्टर तयार करण्यासाठी संशोधन सुरु कोकण कृषी विद्यापीठ आणि लुपिन फाऊंडेशनने हा प्रकल्प हाती घेतला

0
148

 

सिंधुदुर्ग – कोकणी रानमेव्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या जांभळाचे लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी संशोधन सुरू झाले आहे. सिंधुदुर्गात जांभळाची क्‍लस्टर तयार करून त्या-त्या भागाला ‘सूट’ होईल अशा जांभळाच्या संकरित जाती शोधून त्या शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठ आणि लुपिन फाऊंडेशनने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

कोकणात रानावनात नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या जांभळाला काही वर्षात चांगले मार्केट उपलब्ध झाले आहे. प्रक्रिया उद्योगाबरोबरच याचा वापर औषध निर्मितही होऊ लागला आहे; मात्र जांभळाची आवक मर्यादित आहे. याच्या व्यापारी तत्त्वावरील लागवडीला मर्यादा आहेत. आतापर्यंत मार्केटमध्ये येणाऱ्या जांभळामध्ये बहुसंख्य माल हा नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांपासूनचा आहे. कोकण कृषी विद्यापीठाने याआधीच जांभळावर संशोधन करून बहाडोली ही जात विकसित केली आहे; मात्र ही जात प्रामुख्याने पालघरमधील आहे. यामुळे कोकणाच्या इतर भागात ती फारशी सूट होत नाही. साहजिकच याच्या विस्ताराला मर्यादा आल्या आहेत.

सिंधुदुर्गात माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या लुपिन फाऊंडेशनने जांभळाचे हे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी जोडून घेत काम सुरू केले आहे. याबाबतचा सामंजस्य करार नुकताच झाला असला तरी त्यावरील काम वर्षभर सुरू आहे. एकाच प्रकारची संकरित जात सर्वदूर सारखेच रिजल्ट देऊ शकत नाही. याचा विचार करून या प्रकल्पावर काम केले जात आहे. यात जांभूळ बागायतीला पोषक असणारी क्‍लस्टर निवडली जाणार आहे. त्या भागातील उत्कृष्ट असे जांभळाचे झाड शोधले जाणार आहे. त्यांच्यापासून कलमे तयार करून ती त्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पुरवली जाणार आहे. यामुळे त्या भागाला सूट होईल अशी जांभळाची व्हरायटी उपलब्ध होणार आहे. याचा प्रभाव उत्पन्न वाढीवर दिसेल असे विद्यापीठ आणि लुपिनचे म्हणणे आहे. या प्रकल्पात क्‍लस्टर निश्‍चिती शेतकरी शोधण्यासह संशोधनावरील खर्च लुपिनकडून तर प्रत्यक्ष संशोधन कोकण कृषी विद्यापीठ करणार आहे. तीन वर्ष चालणाऱ्या या प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा डोळ्यासमोर ठेवून काम चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here