कोरोना’ने सारे जनजीवन प्रभावित झालेले असताना कोकणातील हापूस आंबा बागायतदारही पुरता हवालदिल झालेला आहे. देशातून होणारी विमानसेवा बंद झाली असून राज्यांच्या सीमा देखील सील केल्या जात आहेत. फळमार्केटची स्थितीही बंदसारखीच असल्याने त्याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. आताच आंबा निर्यातीला प्रारंभ झाला असताना ‘कोरोना’ संकटामुळे तयार होऊ घातलेल्या हापूसचे करायचे काय? अशा मोठय़ा विवंचनेत बागायतदार पडले आहेत.
आज कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिह्यात सुमारे 1 लाख 82 हजार हेक्टर क्षेत्र आंब्याच्या लागवडीखाली आहे. याठिकाणी तयार होणारा हापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) नवी मुंबई त्याखालोखाल पुणे व कोल्हापूर येथील एपीएमसीवर सर्वस्वी अवलंबून राहावे लागते. याबरोबरच देशांतर्गत मंडईत, परदेशी निर्यात, पॅनिंग, स्थानिक मंडईत किरकोळ विक्री आदी माध्यमाने आपल्या मालाची विक्री करते. यावर्षी हवामान बदलाचा मोठा फटका आंब्याला बसला. हवामान बदलामुळे वादळे, थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोनवेळा आलेला मोहर, परिणाम तुडतुडा, भुरी रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, पहिल्या उत्पादनावर होणारा परिणाम अशाप्रकारे आंबा उत्पादनावर यावर्षी मोठा परिणाम जाणवत आहेत.
रत्नागिरी जिह्यात दरवर्षी सरासरी 1 लाख टनापेक्षा अधिक आंबा उत्पादित होऊन सुमारे 400 ते 500 कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. आाखाती देश, युरोप, अमेरिका आदी ठिकाणी हापूसची मोठी बाजारपेठ आहे. पण आता हापूसचे उत्पादन, बाजारपेठ व निर्यात या साऱया आर्थिक गणितावर ‘कोरोना’ ने दहशत माजवली आहे. अशावेळी आता कोरोना कोरोनामुळे हापूस’च्या हंगामाची वाताहात उडण्याची भीती आहे.
यावर्षी हापूस हंगाम सुमारे महिनाभर लांबणीवर गेला असून सुरूवातीला आलेला हापूस आता काढणीयोग्य बनू लागला आहे. सध्या आवक कमी असल्याने पेटीलाही चांगला दर मिळत आहे. हापूसच्या या उत्पादनात बागायतदारांनी लाखोंची गुंतवणूक केली आहे. पण आता कोरोनामुळे त्या निर्यातीवर पाणी फेरले आहे. निर्यातीसाठी असलेली मोठय़ा शहरातील मार्केट तसेच स्थानिक बाजारपेठाही बंद झाल्यामुळे आंबा पाठवणार कुठे या विवंचनेत येथील आंबा बागायतदार पुरता ग्रासला आहे.
नुकसान कसे भरून काढणार?
गुढीपाडव्यापासून खऱया अर्थाने आंबा काढणी व निर्यातीला मूहूर्त साधला जातो. मात्र आताची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर बनली आहे. मार्केटमधील व्यापारीही 31 मार्चनंतरच आंबा पाठवा असे सांगत आहेत. बाजार समित्यामध्ये माल उतरवण्यासाठी हमालवर्ग देखील उपलब्ध नाही. किटकनाशके, फवारणी, कामगार, ते विक्री अशा साऱयांचा विचार करता होणारे अगणित नुकसान कसे भरून काढणार? अशी मोठी चिंता बागायतदारांसमोर उभी आहे.