सिंधुदुर्ग – कोकण रेल्वे मार्गावर पुराचा संदेश देणारी यंत्रणा कोकणातील नऊ स्थानकांवर कार्यरत केली जाणार आहे. 10 जूनपासून कोकण रेल्वे पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आली आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने कोकणात चोवीस तास पेट्रोलिंग केले जाणार आहे. अतिवृष्टीच्या काळात रेल्वेच्या वेगावर मर्यादा ठेवली आहे. एकूणच यंदाच्या मान्सून हंगामात कोकण रेल्वे प्रवासी व रेल्वे गाड्यांच्या द़ृष्टीने सुरक्षित राहावी, यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसह मनुष्यबळाच्या माध्यमातून सतर्क झाली आहे.
पंचवीस वर्षांहून अधिक काळ कोकण रेल्वे धावत आहे. पावसाळ्यात प्रामुख्याने अतिवृष्टीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर अनेक अडथळे निर्माण होत होते. यामध्ये दरड कोसळणे, लोहमार्गावर मोठमोठे दगड येणे अशा घटना घडत होत्या. त्यामुळे अतिवृष्टी काळात रेल्वेचा वेग मंदावत होता.
25 वर्षांचा अनुभव लक्षात घेता या वर्षीपासून कोकण रेल्वेने मान्सून हंगामात रेल्वे प्रवास सुकर व सुरक्षित व्हावा, यासाठी उपाययोजना सज्ज केल्या आहेत. 10 जूनपासून मार्गावर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित राहतील. प्रामुख्याने या मार्गावरील माणगाव ते उडपी दरम्यानच्या प्रदेशातील पावसाची नोंद करणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामध्ये माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे ही यंत्रणा पावसाची नियमित नोंद ठेवेल.
नोंदीमध्ये पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणचे सर्व अधिकारी सतर्क असतील, तर तीन ठिकाणी कोकण रेल्वे लोहमार्ग पुलांसाठी पूर चेतावणी प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामध्ये माणगाव आणि वीर दरम्यान काली नदी, वीर व सापेवामणे दरम्यान सावित्री नदी, चिपळूण व कामथे दरम्यान वाशिष्ठी नदी या ठिकाणी पुराचा संदेश देणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. संबंधित ठिकाणच्या नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास ही यंत्रणा रेल्वे अधिकार्यांना सतर्क करणार आहे. वार्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी रत्नागिरी-निवसर दरम्यान पानवल मार्ग, थिवीम आणि करमाळी दरम्यान मांडवी पूल, करमाळी ते वेळण्णा दरम्यान झुआरी पूल, होन्नावार ते मानकी दरम्यान शरावती पूल येथे ही निमोमीटर यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
कटिंगच्या ठिकाणी चोवीस तास वॉचमन व गस्त ठेवली आहे. या ठिकाणी गाड्यांच्या वेगावर निर्बंध ठेवले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी मोबाईल फोनसह दोन्ही लोको पायलट, गार्डसना वॉकीटॉकी दिले आहेत. 673 कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. रेल्वे मार्गाशेजारी पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक ते नियोजन, स्वच्छता केली आहे.
कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना घडल्यास मार्गावर चोवीस तास अॅक्सिडेंट रीलिफ मेडिकल व्हॅन सज्ज ठेवली आहे. यामध्ये सॅटेलाईट फोनसह सिग्नल यंत्रणा तसेच ही यंत्रणा कार्यरत राहावी यासाठी एलईडीयुक्त दिवे बसविले आहेत. हे मान्सूनचे नियोजन 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.