शिमगा…कोकणतला सर्वात मोठा सण…परंपरा, उत्साह आणि मानपान यांचा संगम. याच शिमगोत्सवाला फाकपंचमीपासून सुरूवात झाली असून होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागला आहे. गावोगावच्या देवदेवतांना रूपं लावण्याची लगबग ग्रामस्थांची पाहायला मिळतेय. एरवी कायम देवाच्या भेटीला मंदिरात जाणार्या भक्तांच्या भेटीला आता देव पालखीत बसून जाणार आहेत. गावागावांत तब्बल महिनाभर हा ‘शिमगोत्सव‘ म्हणजेच गावातील जत्रोत्सवाची, सांस्कृतिक वैभवाची पर्वणी सुरू राहणार आहे.
कोकणात गावोगावी शिमगोत्सवाची सांस्कृतिक परंपरा आजही जपली जाते. या पारंपारिक शिमगोत्सवाचा आनंद गावागावात दिसू लागला आहे. फाकपंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरूवात करतात. शिमगोत्सवाचे ढोल–ताशांचा गजर घुमला की प्रत्येकांच्या अंगात एक वेगळेच चैतन्य व उत्साह संचारतो. या शिमगोत्सवाची रंगत अगदी पौर्णिमेपर्यंत धुलिवंदनापर्यंत सुरू राहते. पण त्यापूर्वी ग्रामदेवतांच्या पालख्या सजवण्यासाठी देवांना रुपे लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होते. त्यासाठी गावकरी, मानकरी, खोत, गुरव अशा सार्यांची गावबैठक त्या त्या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात होते. शिमगोत्सवात होळी तोडण्यापासून ते देवाला रूप लावण्यापर्यंत सर्व मान हे ठरलेले असतात.
गाव बैठकीत पालख्या सजवून त्यामध्ये देवतांना विराजमान केले जाते. देवतांच्या सुवर्ण–चांदीच्या मुर्त्यांना विधिवत पूजन व त्यांना रुपे लावली जातात. पालख्यांमध्ये नववस्त्रांचा साज चढविला जातो. त्यात देवतांच्या आकर्षक दागिने परिधान केलेल्या मुर्त्यां बसविण्यात येतात. पालखी सजविल्यानंतर सर्व ग्रामस्थ गाव समृध्दी, ग्रामस्थांचा एकोपा नांदण्यासाठी गाऱहाणे घालतात. त्यानंतर तेरसे (पौर्णिमे अगोदरचे) शिमगा व पौर्णिमेचे शिमगा उत्सव साजरे होणार आहेत. पत्येक गावांतील शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथाही वेगवेगळ्या दिसून येतात.
त्यादिवशी त्यासाठी देवतांच्या मानाची होळी (सुरमाड किंवा आंब्याचे झाड) नियोजित केलेले असते. त्या नियोजित ठिकाणी पालख्यांची भव्य वाजत–गाजत मिरवणूक ग्रामस्थ काढतात. आणि होळीचे झाड तोडून देवाचा फाकांद्वारे जयघोष करत ते गाव सहाणेवर आणले जाते. तेथे होळी उभी करण्याचा कार्यकम मोठ्या दिमाखात रंगतो. त्यावेळी पालखी नाचवण्याचा आनंदही ग्रामस्थ मनमुराद लुटताना प्रत्येक गावात बघायला मिळतो. कोकणातील अशा या आनंदमयी शिमगोत्सवाला खऱया अर्थाने सुरवात झाली असून गावांमध्ये भक्ती मय वातावरण दिसून येत आहे.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे गावातील श्री. कालिका मंदिरात देवांना रूप लावण्याचा सोहळा संपन्न झाला. श्री कालिका देवी, श्री काळकोबा देव, व वाघजाई या देवतांच्या चांदीच्या मूर्तींना आंघोळ घालून विविध दागिन्यांनी सजवण्यात आलेय. ही पालखी आता गावातील सहाणेवरील मुक्कामी विराजमान झाल्यानंतर रत्नागिरी शहरभेटीला रवाना झाली आहे. तेथील मानाच्या ठिकाणी भक्तगणांच्या दर्शन भेटीला ग्रामस्थ वाजत–गाजत पालखी मिरवणूकीने जातात. ही पालखी शहर दर्शन भेटीनंतर गावातील मुख्य शिमगोत्सवाच्या कार्यकमाला म्हणजेच धुलिवंदनाच्या आदल्या दिवशी पुन्हा गाव सहाणेवर दाखल होणार आहे. अशाचप्रकारे अन्य गावांतूनही ग्रामदेवतांच्या पालख्यांना रुपे लावण्याचे कार्यकम सुरू झाले आहेत