कोकणातला हापूस, प्रक्रिया उद्योग आणि समस्या

0
410

 

कोकणातील हापूस आंबा हा भारतीय फळांमध्ये विशेष चवीने खाल्ला जातो. या फळासाठी भरपूर सूर्य प्रकाश, इथला समुद्र आणि खाड्यांवरून वाहणारी खारी हवा पोषक वातावरण निर्माण करते. इथल्या जांभ्या दगडात बहरलेल्या हापूस आंब्याच्या बागा कोकणच्या अर्थकारणात सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल घडवून आणतात. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. कोरोना काळात ऑनलाईन व्यवस्थेशी हापूस व्यावसायिकांनी फारसे जमवून घेतलेले दिसत नाही. तर आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूस समोर कायम राहिलेला आहे. हापूसची मार्केटींगची व्यवस्था आजही दलाल केंद्रित राहिलेली आहे. त्यामुळे या फळाचे दरही कायम अनिश्चित राहतात.

कोकणातील हापूस समोरील काही अडचणी

अवकाळी पाऊस, उष्णता, थंडी याचे कमी-अधिक होणारे प्रमाण, वातावरणात होणारे बदल या साऱ्या संकटांना गेल्या आठ-दहा वर्षांपासून विशेषतः कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी सामोरे जाताना मेटाकुटीला येत आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ७० टक्के कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी आली. त्यामुळे १० टक्के हापूस आंबा कलमांना मोहोर आला. तसेच यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. त्यामुळे आंबा कलमे मोहोरण्यास वातावरणही अनुकूल नव्हते. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर डिसेंबर महिन्यात येतो व तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील मोहोर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येतो. यावर्षी ही सर्व प्रक्रिया एक महिना लांबणीवर पडल्याने एक महिना उशिरा पीक येईल. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ १० टक्केच आंबा उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या २ वर्षात कोरोनाच्या महामारीने आंब्याची संपूर्ण निर्यात ठप्प झाली होती. या संकटामुळे हातातोंडाशी आलेला आंबा बाजारात पोहोचू शकला नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून आंब्यासाठी लागणारी खते, फवारणी, मशागत यांचा आंबा उत्पादकांना करावा लागणारा खर्च कितीतरी पटीने वाढला आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. मात्र निसर्ग संकटात हापूस सापडला कि इथला बागायतदार कर्जबाजारी होतो. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण वाढलेले आहे. विदेशी बाजारात येथील हापूस थेट गेला पाहिजे या करता सरकारच्या पातळीवर फारशी पावले उचलली जात नाहीत. हापूस आंबा निर्यात करताना विमान वाहतुकीमधील येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे.

हापूसवरील प्रक्रिया उद्योगांची स्थिती

कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग फारसे नाहीत. कॅनिंग उद्योग येथे फारसा बहरलेला नाही. कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून साधारण दोन लाख मेट्रीक टन आंबा उत्पादित होतो. इथून श देश विदेशातल्या बाजारात पाठवला जातो. मात्र हापूसच्या प्रक्रिया उद्योगाने त्या प्रमाणात झेप घेतलेली नाही. कॅनिंग कंपन्यांसमोर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. कोकणात कुठल्याच विषयात सहकार रूजत नाही. आंबा कॅनिंगही त्याला अपवाद नाही. दोन्ही जिल्ह्यांत लहान-मोठे ५० च्या जवळपास खासगी कॅनिंग उद्योग आहेत. कॅनिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता, सरकारचे अनुदान धोरण, दर्जा टिकवण्यासाठी होणारा खर्च, वाढता उत्पादन खर्च यामुळे कॅनिंग उद्योग अडचणीत गुफ़ाटला आहे. दुसरं अस्सल हापूसच्या आंब्याच्या रसाचा उत्पादन खर्च आटोक्यापलीकडचा आहे. तोतापुरी, बलसाड आंब्याच्या रसाचा उत्पादन खर्च त्यामानाने कमी आहे. त्यामुळे रसासाठीही कोकणातला हापूस फारसा जात नाही.

कोकणच्या हापूसला जीआयचे नामांकन तरीही ग्राहकांची फसगत

कोकणातील हापूस आंब्याला जीआयचे नामांकन मिळाले आहे. त्यामुळे आता केवळ कोकणातील आंब्यालाच हापूस म्हणता येणार आहे. हापूसच्या नावाने कर्नाटक दक्षिण भारतातील आंबा अक्षरश: ग्राहकांच्या माथी मारला जात होता. हि फसगत थांबावी म्हणून कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रयत्नातून हे जीआयचे नामांकन मिळाले आहे. मात्र असे असले तरी बाजारात मात्र सर्रास सर्व प्रकारच्या आंब्यांना हापूसच्या नावाने आजही खपवले जाते. याचा परिणाम कोकणातील हापूसला निश्चितच सहन करावा लागतो. यामुळे खऱ्या हापूस आंब्याची प्रतिमा खराब होत आहे आणि हापूस आंब्याबाबत आंबा खवय्यांचीही फसगत होत आहे. हि फसगत थांबण्यासाठी जीआयचे नामांकन फायदेशीर ठरणारे होते. मात्र काही व्यापारी पेटी देवगडची वापरून त्यात आंबा अन्य भागातला भरत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यावर पायबंद बसावा म्हणून कोकणातील हापूस व्यावसायिकांनी आता पणन महामंडळाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे मँगो वाईन संशोधन

द्राक्षाच्या धर्तीवर मॅंगोची वाईन बानू शकते यावर दापोली कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले. पिकलेल्या हापूस आंब्यापासून वाईन तयार करण्याचे संशोधन कार्य २०१० साली सुरू झाले. या संशोधनाला यश मिळून २०१४ साली झालेल्या संयुक्त संशोधन समितीच्या सभेमध्ये त्याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे कोकणातील फळांपासून वाईन निर्मिती करू इच्छिणा-या उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने २००७ साली फळ पेये संशोधन केंद्राची स्थापना करून वाईनवर संशोधन कार्य सुरू केले. या विद्यापीठाने काजूबोंड, करवंद, जांभूळ आणि कच्चा आंब्यापासून वाईन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. मँगो वाईन निर्मिती प्रकल्प कोकणात उभे राहिल्यास हापूसला चांगला दार मिळेल. त्यातून बागायतदार दलालांच्या चक्रातून बाहेर येऊ शकतो.

दलालीच्या विळख्यातील हापूस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही मागेच

कोकणातील हापूस आंब्याची अडचणीची दुसरी एक बाजू म्हणजे वितरण व्यवस्था आणि व्यापार, या दोन्ही बाबी आजही पारंपरिकच आहेत. येथील बगतदाराला कायम व्यापाऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे, डाळिंब व खान्देशामधली केळी यांच्या मार्केटिंगचे नियोजन तेथील शेतकऱ्यांनी आणि सरकारने केले. त्यात आंबा मागेच राहिला आहे. थेट शेतातूनच मालाची निर्यात करण्याचे भाग्य आजही कोकणातील हापूसच्या नशिबी नाही. दलाल आधारित मार्केटिंग व्यवस्थेमध्ये सर्वांत कमी वाटा वर्षभर प्रचंड परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि मोठा वाटा मधल्या वितरण व्यवस्थेला अशी स्थिती हापूसच्या बाबतीत आहे. सुरुवातीला हापूस आंब्याचे पेटीचा भाव भरपूर द्यायचा आणि एप्रिल-मे महिन्यांत मुख्य पीक आल्यानंतर भाव पाडायचे. अगदी हजार, सातशे, पाचशे, चारशे असे पेटीचे भाव आल्यानंतर वर्षाच्या शेवटी आलेली सरासरी हि पाचशे, सातशे, आठशे रुपये मिळालेली असते. दलालांची मक्तेदारी तोडण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा एक पर्याय बगतदारांसमोर होता, मात्र या माध्यमातून काही करण्याच्या बाबतीत कोकणातील बागायतदार आजही मागेच आहे. एक प्रयोग तीन महिला उद्योजकांनी येऊन केला आहे. ‘मायको’ हे देशातील आंबा बागायतदारांचे पहिले ई-कॉमर्स पोर्टल www.myko.com कोकणातील बागायतदारांना विक्रीचा नवा मार्ग दाखवणारे आहे.

शेवटी स्पर्धेत टिकायचे असेल तर नव्या विचारांना संधी, नव्या तंत्रज्ञानाचे अवलोकन व हाताळणी, उत्पादनातील दर्जा, बाजारातील मागणी नुसार उत्पादनातील बदल आणि जास्तीतजास्त प्रक्रिया उद्योगांचे आले वाढविणे या बाबींवर हापूसच्या बाबतीत भर देण्याची गरज आहे. मात्र त्याचाच काहीसा अभाव असल्याने कोकणातील हापूस सर्व फळांमध्ये वेगळा असला तरी सर्व फळांपासून सर्वार्थाने वेगळा राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here