सागाच्या बागेत मिरी लागवड करत सिंधुदुर्गातील शेतकऱ्याने नवतरुणांना रोजगाराचा दिला नवा मार्ग

0
60

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी गावचे रहिवाशी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवडीची ख्याती नायजेरिया या देशतही पोचली आहे. अवघ्या ६ वर्षात एका एकर मधील ६५० सागाच्या रोपांवर शास्त्रीय पद्धतीने त्यांनी ६४० मिरीच्या रोपांची लागवड केली. गतवर्षी या रोपांनी त्यांना ५०० किलो मिरीचे उतपन्नदिले आहे. बाजारात सध्या ८०० ते १००० रुपये किलो मिरीचा भाव आहे. यावरून लाखो रुपयाची शास्वत पिकाची खात्री देणारा मिलिंद प्रभू यांचा हा मिरीचा प्रयोग कोकणातील नवतरुणांना रोजगाराचा नवा मार्ग देणारा ठरत आहे.

मिलिंद प्रभू यांनी बी.कॉम. व नंतर एमबीए पूर्ण केले. त्यानंतर मुंबईत खाजगी नोकरी केली. त्याच वेळी गावी असलेल्या एक एकर जमिनीत बारा वर्षापूर्वी ६५० सागाच्या रोपांची लागवड त्यांनी केली. साधारणपणे सागाचे आयुष्य पंचवीस वर्षे धरल्यास संपूर्ण उत्पन्न पंचवीस वर्षानी मिळणार होते. यामुळे पंचवीस वर्षापर्यंत या सागाच्या बागेत काय करता येईल यासाठी प्रभू यांनी प्रयत्न सुरू केले. वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचे सेवानिवृत्त सहयोगी संचालक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सागाच्या बागेत मिरीच्या लागवडीसह इतर मसाला पिकांची आंतरपीक म्हणून निवड केली. काही दिवसांतच मेहनतीचे चीज होऊन शाश्वत नफ्याची हमी त्यांना मिळाली. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन या मसाला पीकशेतीवर लक्ष केंद्रित केले आहे.

मिलिंद प्रभू यांच्या एक एकरमधील सागाच्या या बागेत ६४० मिरीची रोपे तसेच उर्वरित जागेत लवंगची ८० रोपे, जायफळ ८० रोपे, वेलदोडा ४० रोपे, दालचीन १० झाडे लावण्यात आली आहेत. या सर्वाची वाढसुद्धा समाधानकारक होत आहे. प्कोरभू यांनी कण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील नारळ संशोधन केंद्र भाटय़े मधून ‘पेन्नूर १’ या जातीची त्यांनी मिरीची वेल रोपे आणली. मिरीसाठी दीड-दीड-दीड फूट आकाराचा खड्डा प्रत्येक सागाच्या मुळात मारण्यात आला. सागाची वाढ व्यवस्थित झालेली असल्याने यामुळे कोणताही अपाय या झाडाला झाला नाही. खडय़ात दोन टोपल्या शेणखत, अर्धा किलो निम पेंड, अर्धा किलो सुपर फॉस्फेट मातीत मिक्स केले. रोप लावल्यानंतर रोपाला आधार दिला. साधारणपणे एक हात उंच वाढल्यानंतर वेलाचे शेंडे खुटून टाकले. त्यामुळे वेलाची पुढे होणारी वाढ थांबली व दोन ते तीन नवीन फांद्या या वेलींना आल्या. वेलीच्या मुळात मजबुती असेल तर पुढे वाढसुद्धा निरोगी होते व पोषणद्रव्येसुद्धा व्यवस्थित पोहोचतात.

अशा प्रकारे नवीन आलेल्या दोन ते तीन फांद्या पुन्हा हातभर वाढल्यानंतर खुडण्यात आल्या. या फांद्या खोडाला बांधून ठेवण्यात आल्या. पहिली दोन वर्षे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत या वेलींची वाढ होऊ न दिल्याने जमिनीलगतच्या वेलांना चांगल्या प्रकारे मजबुती आली. मुळाच्या आधाराच्या फांद्या मजबूत होऊन वेलाचे पोषण सुद्धा चांगले झाले. दर चार महिन्यांनंतर सुफला १५-१५-१५, सुफला १८-१८-१८ अर्धाकिलो या प्रमाणात देण्यात आले. मिरीच्या वेलांवर त्यांना पावसाळ्यात पाने खाणारी अळी व पानावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. याचा प्रतीकार करण्यासाठी त्यांनी बोडरे मिश्रण एक टक्का, बाविस्टीन एक लीटरला एक ग्रॅम या प्रमाणात फवारणी केली आणि रोगावर नियंत्रण मिळवले.

मिरीवेल लागवडीनंतर सातत्याने छाटल्याने वेल मजबूत व निरोगी तयार झाले. केवळ अडीच वर्षातच वेलीवर हिरवीगार फळे तयार झाली. या पिकाकडून साधारणपणे पाच वर्षापर्यंत व्यापारी उत्पन्नाची अपेक्षा नसते. परंतु प्रभु यांच्या या बागेत अडीच वर्षानंतर ३३ किलो ताजी मिरी मिळाली. पाचव्या वर्षी एका वेलापासून दीड किलोपेक्षा जास्त मिरी मिळेल असा विश्वास तज्ज्ञ मार्गदर्शक पाटील यांनी व्यक्त केला आहे. मिरीच्या भरघोस उत्पन्नासाठी पहिल्या दोन वर्षात वेलीची दोन मीटरपेक्षा वाढ होऊ न देणे तसेच पाच वर्षात साडेपाच मीटरपेक्षा जास्त उंची या वेलीची वाढ होऊ न देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सागासाठी पूर्वी असलेल्या ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठय़ामध्ये छोटे पाइप वाढवून मिरीसाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले. ठिबकमुळे पाण्याचा वापर मर्यादित झाला. मिरीला जुलै महिन्यात फुले येण्यास सुरुवात होऊन फळे साधारणपणे जानेवारी महिन्यात काढायला तयार होतात. काढणी केलेल्या मिरीपासून काळी, पांढरी तसेच हिरवी मिरी तयार केली जाते.

प्रभू यांच्या मिरी लागवडीची ख्याती पार नायजेरिया पर्यायंत पोचली आहे. काही वर्षापुर्वू या देशातील जीबॅको या भागाचे नगराध्यक्ष जॉन तमन, अगवाराचे नगराध्यक्ष जाफरा मोहम्मद, आयेडाचे चेअरमन मुसा बावा, आयेडाचे समन्वयक ओके बेकुरे आदींनी त्यांच्या या प्रकल्पाला भेट दिली. मिलिंद प्रभू यांनी मिरी लागवड आणि त्यातून मिळणारा शास्वत नफा याची माहिती कोकणातील बेरोजगार तरुणांपर्यंत पोचावी आणि त्यांनीही या व्यवसायातून स्वताच्या रोजगाराचे साधन निर्माण करावे यासाठी २०१७ मध्ये स्वखर्चाने मिरी महोत्सवाचे आयोजन केले होते.

केवळ मिरीची लागवड करून न थांबता मिलिंद प्रभू यांनी मिरीबरोबरच लवंग, जायफळ, वेलदोडा, दालचीन इत्यादी मसाला पिकांची लागवड केली आहे. त्यांनी मलबार जातीच्या ४० वेलदोडय़ांची रोपे भाटय़े रत्नागिरी येथून, तामिळनाडूमधून लवंग ८० रोपे, जायफळची स्वाद व सुगंधा या जातीची ८० रोपे, दालचीनची कोकण तेज व तेज कोकण पत्ता जातीची दहा रोपे लावली आहेत. लवंग व जायफळ लावताना चार झाडांच्या मध्यभागी चौफुलीवर लावली आहेत. एक चौकोन सोडून लवंग किंवा जायफळ लागवड केली आहे. मिरीला त्रास होणार नाही अशा प्रकारे जायफळ वाढू द्यावे. साधारणपणे तीन वर्षानी फळे मिळतात. लवंग सहाव्या वर्षी तर वेलदोडा दुस-या वर्षी मिळायला सुरुवात होते. प्रभू यांच्या मसाला बागेत वेलदोडय़ाची फळे जमिनीलगत लगडलेली दिसून येत आहेत.

झिरझिरीत ऊन व सावली (पार्शियल शेड) मसाला पिकांना अतिशय आवश्यक असते. अशा प्रकारचे वातावरण कोकणापेक्षा अन्य कुठे चांगले असेल? मसाल्याच्या पिकासाठी कोकणचे वातावरण अतिशय पोषक असल्यानेच चांगली वाढ या पिकाच्या रोपांची झाल्याचे आपल्याला अनुभवता येत आहे. जिल्हा कृषी विभागाला प्रभू यांच्या मिरी लागवडीबाबत माहिती मिळाल्यानंतर काही कृषितज्ज्ञांनी ही बाग पाहण्यापूर्वी सागावर मिरीचे उत्पन्न चांगले येऊ शकत नाही, असा अभिप्राय दिला. मात्र ही बाग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांचे हे मत बदलले.

प्रभु यांनी आपल्या जमिनीत सागाचीच निवड केली. कारण पाऊस बेभरवशाचा बनत आहे. वातावरणात वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे आंबा, काजू बागायती धोक्यात येत आहेत. पर्यावरणातील बदलांचा परिणाम एकूणच उत्पन्नावर होत आहे. आज शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी कुठलेही पीक देऊ शकत नाही. या सगळ्याचा सारासार विचार करूनच प्रभू यांनी सागाची लागवड केली. कारण सागाच्या झाडाला कोणताही रोग सहसा येत नाही व देखभाल खर्चसुद्धा फारच कमी आहे. सागाव्यतिरिक्त सिल्व्हर ओक, रक्तचंदन या झाडांची निवड केल्यास फायद्याची ठरते. आपण मिरी लागवड करतो, पण वेलाची वाढ शास्त्रोक्त होणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिरी लागवड केल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल, असा विश्वास प्रभु यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्या – मुंबईत नोकरीच्या शोधात कोकणातून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्वत:च्या जमिनी ओसाड ठेवून नोकरीच्या शोधात भटकणा-या युवकांनी त्यांच्या या यशोगाथेतून नक्कीच बोध घेण्यासारखा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here