सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस प्रभारी जिल्हाध्यक्षांची नवी कार्यकारिणी मानण्यास काही कार्यकर्त्यांचा नकार

0
128

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या चांगलाच वाद पेटला आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी नव्याने निवडलेली कार्यकारिणी आपल्याला मान्य नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर जिल्हा प्रभारी राजन भोसले व पक्ष निरीक्षक सुभाष चव्हाण दोघेही बिकावू आहेत. असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष गावडे यांच्यावर सडकून टीका केली. प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी निवडलेल्या कार्यकारीणीबाबत प्रदेश काँग्रेसकडून पत्र येत नाही तोपर्यंत जुनीच कार्यकारणी अधिकृत आहे, असा दावा काँग्रेसच्या या पदाधिकार्‍यांनी केला आहे. तसेच हायवेबाबत बाळा गावडे यांनी केलेले आंदोलन अर्थपुर्ण असुन असेच लोक त्यांनी आपल्या कार्यकारणीत जवळ केल्याचा आरोपही यावेळी या कार्यकर्त्यांनी केला.

प्रभारी जिल्हाध्यक्ष गावडे यांच्याकडून अलीकडेच जिल्ह्याची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा दोन गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. गावडे विरोधी गटाने येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये पत्रकार परिषद घेऊन टिकास्त्र सोडले. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, मालवण तालुका उपाध्यक्ष अरविंद मोंडकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष काशिनाथ दुभाषी, शहर उपाध्यक्ष उमेश सावंत, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संतोष जोईल, सुधीर मल्हार, चंद्रकांत राणे, तौकीर शेख, सरदार ताजर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अंधारी म्हणाले, “बाळा गावडे हे प्रभारी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना सहा महिन्यासाठी हे पद दिले असून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नाही. मुळात काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धत चालते हुकूमशाही नाही. असे असताना गावडे यांनी कोणाला विश्‍वासात न घेता कार्यकारणी निवडली. मला तालुकाध्यक्ष राहण्याची आजही इच्छा नाही. त्यांनी सर्वांना विश्वासात घेतले असते तर मी पदावरून पायउतार होण्यास सर्वात प्रथम इच्छा व्यक्त केली असती; मात्र आत्ताची निवडण्यात आलेले कार्यकारणी अनधिकृत नसून जोपर्यंत या कार्यकारिणीला प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत जुनीच कार्यकारणी अधिकृत आहे.” बाळा गावडे यांचे राजकारण मर्यादित आहे. विकास सावंत यांच्याशी त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. त्यांनी नेहमी दुसर्‍यांच्या ओंजळीने पाणी पिण्याचे काम केले आहे, असा आरोप बाळू अंधारी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here