सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळा शिक्षकांविना, ठाकरे गट शिवसेना आक्रमक

0
173

 

सिंधुदुर्ग – शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची बदली झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार असून देखील त्यांनी या प्रश्नावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याने त्यांचा निषेध व्यक्त करत सदर शाळांना शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समितींवर जोरदार आंदोलन केले. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्यात, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले तालुक्यात, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तालुक्यात, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यात, त्याचबरोबर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील पंचायत समितींवर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व पालकांसमवेत आंदोलन छेडण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी यांना निवदेन देण्यात आले. येत्या १५ दिवसात शिक्षक प्रश्न न सुटल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत! कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही! शिक्षण मंत्री हाय हाय! शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध असो! शिक्षण मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय! ५० खोके एकदम ओके! शिक्षण आमच्या मुलांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे! अशा गगनभेदी घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here