सिंधुदुर्गात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार कणकवली पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

0
105

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हि युवती ७ महिन्यांची गरोदर आहे. आज कणकवली पोलिसात या घटनेप्रकरणी रॅन्सी फ्रान्सिस फर्नांडिस ( ३३ रा. फोंडाघाट-टेंबवाडी) याच्या विरोधात मुलीच्या तक्रारी वरून पॉस्को,अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सप्टेंबर २०१९ पासून घडली. पिडीत युवती ही कणकवलीच्या बाजूच्या तालुक्यातील आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, कि तिला सप्टेंबर २०१९ मध्ये मोबाईलवर अनोळखी कॉल आला होता. त्यातून या संशयिताचे आणि त्या युवतीची ओळख झाली आणि त्यांच्यात संभाषण वाढून प्रेम झाले. त्यानंतर काही कालावधीत त्याने युवतीला भेटायला कणकवलीत बोलवले. ती कणकवलीत आल्यावर तिला घेऊन तो नांदगाव येथील लॉजवर गेला आणि तिच्याशी जबरदस्ती करून शारिरिक संबंध ठेवले. मात्र नंतरही तो त्या युवतीला फोन करत होता. त्यावेळी त्या युवतीने त्याला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याने आपल्या भेटीबाबत आपण व्हिडिओ क्‍लिप केली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती युवती घाबरली आणि त्यानंतर त्याने अनेकवेळा तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. २०२० मध्ये त्या युवतीने त्याला आपल्याशी लग्न करण्यास सांगितले असता त्याने आपण वेगळ्या समाजाचा आणि ती वेगळ्या समाजाची असे कारण देत नकार दिला. अलिकडेच १७ ऑक्टोबर रोजी त्या युवतीला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी त्या युवतीने कणकवली पोलिसात धाव घेऊन संशयित रॅन्सी फर्नांडिस याच्याविरूध्द तक्रार दिली. याप्रकरणी त्याच्यावर पॉस्को, अ‍ॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here