सिंधुदुर्गात सत्यशोधक उतरले कणकवलीच्या रस्त्यावर, घोषणांनी महामार्ग दणाणला, उत्तरप्रदेश मधील घटनेचा केला निषेध घोषणा आणि क्रांतीगीतांनी महामार्ग सोडला दणाणून

0
63

 

सिंधुदुर्ग – उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेला बलात्काराचा व तिच्या निधनानंतर राज्य सरकारने केलेल्या अमानवी व्यवहाराचा तीव्र निषेध करत आज सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पिढीतेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स पाळत लोकशाही पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा आणि क्रांतीगीतांनी महामार्ग दणाणून गेला होता.

केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर उत्तरप्रदेश पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी आपली भूमिका मांडताना सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गचे पदाधिकारी म्हणाले कि, १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील भूलगडी या गावात घडलेली दलित मुलीवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून निषेधार्ह आहे.ही घटना एकूणच भारतातील जातीव्यवस्था -पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचे द्योतक आहे. हाथरस घटनेचा घटनाक्रम लक्षात घेता हे सिद्ध होते की, उत्तर प्रदेशातील सरकार व तिचे प्रशासन आणि वरचढ शेतकरी जातीतील उच्चभ्रू यांची अभद्र यूती ही अमानवीय घटना दाबून टाकण्यासाठी आणि आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल न करता पिडीत मुलीकडे दुर्लक्ष करणे,वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न मानता पिडीत मुलीला वेगळ्याच दवाखान्यात दाखल करणे,पिडीत मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे,तिच्या कुटुंबाला डांबून ठेवणे व इतरांशी संपर्क न करू देणे हा गुन्हा दाबून टाकण्याचा संतापजनक प्रयत्न असून लोकशाही मूल्यावरच अत्याचार करण्यासारखे आहे.

यावेळी पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. हाथरस बलात्कार प्रकरणाची न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. हाथरस बलात्कार घटनेची F.I.R. घेण्यास हलगर्जी करणा-या पोलिस अधिका-यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. हाथरस बलात्कार पिडीत मुलीच्या शवाची कुटुंबाला अंधारात ठेवून विल्हेवाट लावण्याचा अमानवी व्यवहार करणा-या अधिका-यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. वाढत्या स्त्री हिंसाचाराच्या विरोधात सरकारने कठोर धोरण राबवावे. कोरोनाने मृत्यू झाला असता तर पैसेदेखिल मिळाले नसते असे बेजबाबदार वक्तव्य करणा-या व पिडीतेच्या कुटुंबियांना धमकावणा-या जिल्हाधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
योगी आदीत्यनाथ यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशात स्त्रीयांवरील अत्याचार व जातीय अत्याचार बेसुमार वाढले असून स्त्रिया व दलित आदीवासींची सुरक्षा करण्यात उत्तर प्रदेशचे योगी सरकार सपशेल अपयशी ठरले असून केंद्र सरकारने योगी सरकार बरखास्त करावे. अशा मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात अंकुश कदम, स्वाती तेली, दिपक दाजी कदम, दिपक जाधव, विकास कदम, अनघा कदम, सुमित पेडणेकर, महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, निलिमा जाधव, राजेंद्र कांबळे, हनुमान दया आजवेलकर, रोशन कदम,साक्षी जाधव,मोहिनी तांबे, निवृत्ती तांबे, क्रांतीराज सम्राट, कृष्णा जाधव, निलेश जाधव, सुनील कदम, राहुल कदम, रितेश तांबे आदी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना स्वाती तेली म्हणाल्या त्या पिढीत मुलीची जी विटंबना सरकारने केली ती अत्यंत निंदनीय आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींवर अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे.

महेश पेडणेकर म्हणाले भाजप प्रणित राज्यात दलित लोकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे अत्यंत वाईट आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेकडे वेगळ्या पातळीवर पाहिलं गेलं पाहिजे. याबाबत जनतेच्या तीव्र भावनेचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here