सिंधुदुर्गतील तेरेखोल नदीपात्राच्या किनाऱ्यावरील माड बागायतीला मोठा धोका, बागायती वाचवायची शेतकऱ्यांना चिंता बागायतदारांचे होतेय मोठे नुकसान

0
171

 

सिंधुदुर्ग – यावर्षी सरासरीहून अधिक पडलेल्या पावसात तेरेखोल नदीला आलेल्या भरतीच्या उधाणामुळे आरोसबाग येथे नदी किनाऱ्यालगतची माड बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे. यामुळे ऐन कोरोना संकटात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी पाऊस खूप पडल्याने तेरेखोल नदीच्या जबड्यातून बागायती वाचवायच्या कशा, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

तेरेखोल नदीला बांदा, आरोसबागपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी येते. बांदा रामनगर, आरोसबाग, मिळगुळी, लकरकोट येथे तेरेखोल नदीच्या उधाणामुळे कित्येक एकर क्षेत्रातील जमीन नदीपात्रात कोसळली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेली बागायतीही नदीपात्रात कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी हा प्रकार होत असल्याने बागायती व शेतजमीन वाचविण्यासाठी नदी काठालगत दगडी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे. बांदा, शेर्ले, कास, किनळे, कवठणी, सातार्डा येथेही तेरेखोल नदी किनाऱ्यालगत शेकडो एकर जमीन नदीपात्रात कोसळली आहे. पावसाळ्यात तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात कित्येक एकर बागायती पाण्याखाली जाते.

आठ वर्षांपूर्वी तेरेखोल नदीकाठी रामनगर याठिकाणी 30 मीटर लांबीची दगडी संरक्षक भिंत बांधली होती. त्यामुळे काही प्रमाणात जमिनीची धूप थांबली होती. दरवर्षी याठिकाणी सुमारे 30 मीटर लांबीची भिंत बांधण्याचे आश्‍वासन मेरिटाईम बोर्डाने दिले होते; मात्र दुसऱ्याच वर्षी हे आश्‍वासन हवेत विरले. आतापर्यंत शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी दगडी भिंत मंजूर आहे, मात्र निधी नसल्याचे कारण देत अद्यापपर्यंत भिंतीचे काम हे सुरू करण्यात आले नाही. बांदा ते आरोसबागपर्यंत सुमारे एक किलोमीटर क्षेत्र या उधाणामुळे बाधित झाले आहे. माड बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे.
महसूल प्रशासनाने नुकसानीचा वेळोवेळी पंचनामाही केला आहे; मात्र अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याठिकाणी शासनाने वेळीच लक्ष देऊन संरक्षक भिंत बांधावी तसेच आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

पावसाळ्यात शेर्ले-आरोसबाग येथून बांदा शहरात येण्यासाठी नदीपात्रात होडीचा वापर करण्यात येतो. दरवर्षी स्थानिक श्रमदानाने होडी चालवितात. आरोसबाग येथील नदीपात्र हे उथळ आहे, तर बांद्यात नदीपात्र हे उंचावर आहे. याठिकाणी जमीन नदीपात्रात कोसळत असल्याने पावसाळ्यात बांदा किनाऱ्यावर होडी कुठे लावावी, असा प्रश्न आहे. नदीपात्रात बांदा-आरोसबाग येथे पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी नदीकाठी पुलाचे खांब उभारले आहेत. दरवर्षी माती कोसळण्याचा प्रकार होत असल्याने यामुळे भविष्यात पुलालाही धोका आहे. दरवर्षी उधाणामुळे येथील बागायती जमीन पात्रात कोसळते. शासन केवळ पंचनाम्यांचा देखावा करते. प्रत्यक्षात अद्याप रुपयादेखील भरपाई मिळाली नाही. संरक्षक भिंत बांधल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल. यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा. अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here