सिंधुदुर्गच्या सीमेवरचा पारगड आणि तानाजी मालुसरे यांचे वंशज

0
544

 

सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील मालुसरे यांचे वंशज कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड तालुक्यातील आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या पारगड किल्ल्यावरील आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून ते रसिकजनांच्या मनावर अधिराज्य केलेल्या या चित्रपटाचे नाते पारगड किल्ल्याशी असल्याने तालुक्यासह जवळील चंदगड तालुक्यातील शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. सध्या मालुसरे यांचे तेरावे वंशज पारगड येथील असून तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकल्यावर, वीरगती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे म्हणत त्यांच्याकडे दिलेली कवडय़ाची माळ मालुसरे यांचे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या कुंटुबियांनी आजही जपून ठेवली आहे.

नरवीर, शूरवीर, शिवरायांचा निष्ठावंत मावळा आणि अजरामर शौर्यगाथा असलेल्या तान्हाजी मालुसरे यांच्या साधारण दहा पिढय़ा चंदगड तालुक्यात वाढल्या. हा अनेकांना ज्ञात नसणारा इतिहास या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आला आहे. मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे व कुटुंबीय आजही दर मे महिन्यात पारगडला येतात. सध्या ते कामानिमित्त महाड-रायगड येथे स्थायिक आहेत.

नव्या पिढीतील ‘रायबा’ही आहे तेराव्या वंशजात

डॉ. मालुसरे म्हणाल्या, पारगड येथे मालुसरे यांचा वाडा आहे. शिवाय तलवार गडावर असून माळ आपल्या घरी आहे. आपले सासरे बाळकृष्ण मालुसरे यांच्याकडून आपणाला इतिहासकालीन बरेच संदर्भ मिळाले. शिवाय ‘नरवीर तान्हाजी मालुसरे शिवशाही’ यावर प्रबंध सादर केल्यामुळे डॉक्टरेटही मिळाली आहे. तर आपला मुलगा एम.बी. ए. चे शिक्षण घेत असून त्याचे नाव ‘रायबा’ असे ठेवले आहे. आपण अनेक इतिहासकालीन कार्यक्रम करतो. त्यावेळी तान्हाजी मालुसरे यांचे वंशज असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. खूप मानसन्मान मिळतो. पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासाला उजाळा मिळाला असून नव्या पिढीसमोर शौर्याचा इतिहास समोर आल्याचा आनंद वाटतो.

चित्रपटात अनेक बदल सूचविले

हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी कथानकापासुन सेटवरील प्रसंग आपण पाहिले. घोरपड दाखवायचा असलेला संदर्भ, तानाजी की तान्हाजी किंवा आवश्यक बदल आपण दिग्दर्शक ओम राऊत यांना सांगितले. या चित्रपटाचे मुख्य नायक, नायिका अजय देवगण, काजोल यांनी हुबेहुब अभिनय साकारल्याने तान्हाजी जसेच्या तसे डोळय़ासमोर उभे राहतात. शौर्याचा इतिहास जागा होतो. त्यामुळे चित्रपटाने रसिकांच्या हृदयात घर केले. आपणाला सुरुवातीपासूनचे संदर्भ माहिती असल्याने आम्ही सूचवलेले बदल केल्याने चित्रपटावर आक्षेप घेण्याची वेळ आली नाही. शिवाय तो आपला वाटू लागला, अशा भावना डॉ. मालुसरे यांनी व्यक्त केल्या.

‘ती’ माळ आजही संग्रही

तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर चढाई करताना ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे’ असे म्हणत स्वारी केली. कोंढाणा जिंकलासुद्धा. मात्र, ज्यांनी झुंज दिली, त्या तान्हाजींना वीरगती प्राप्त झाली. मावळे जेव्हा पालखीतून तान्हाजींना घेऊन आले, त्यावेळी सहज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द आले की, ‘गड आला, पण सिंह गेला’ आणि त्यांनी आपल्या गळय़ातील माळ काढून तान्हाजींना अर्पण केली. ती 350 वर्षांपूर्वीची कवडय़ाची माळ तेरावे वंशज म्हणून आजही जपून ठेवली आहे.

दोडामार्गातील अनेकांचा पारगडशी नातेसंबंध

दोडामार्ग तालुक्यातील खासकरून मोर्ले, घोटगेवाडी येथील बऱयाचजणांची आडनावे शेलार, माळवे, पवार अशी आहेत. पारगडहून स्थलांतरित झालेली कुटुंब दोडामार्ग तालुक्यात विखुरली आहेत. मोर्ले गावातून पारगडला जाण्यासाठी पायवाट होती. त्या ठिकाणी आता मोठा डांबरी रस्ता होत आहे. यामार्गेच पारगड येथील प्रसिद्ध माघी (म्हाई) उत्सवास भक्त अवघ्या दीड तासाच्या अंतरात पायी चालत जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here