संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे, निलेश राणे यांचे ट्विट

Share This Post

शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना राऊत यांनी यासंदर्भात पत्रही पाठविले. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. “संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

संसदच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्याआधीच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली. “शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे,” असं जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच या अधिवेशनाला शिवसेनेच्या सर्व खासदारांची आसनव्यवस्था बदलून त्यांना विरोधीपक्षांच्या बाकावर स्थान देण्यात आले आहे. यामुळे संजय राऊत यांची राज्यसभेतील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली आहे. मात्र याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत माझी आसनव्यवस्था करणे हे धक्कादायक आहे. कुणी तरी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी, आमचा आवाज दडपण्यासाठी हा प्रकार आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. याबाबत आक्षेप नोंदवणारे पत्रही त्यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र पाठविले आहे. यावरुनच निलेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. “तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. २०१९ चा “रड्या ऑफ द ईयर अवार्ड” संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

एनडीएमधून शिवसेनेला बाहेर काढण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मंगळवारी ‘सामना’च्या अग्रलेखामधून ‘हिंमत असेल तर या अंगावर’ असं म्हणत भाजपाला आव्हान देण्यात आले होते. “आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून करण्यात आला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत,” अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली होती.

0 Reviews

Write a Review

Goa News Hub

Read Previous

Pune police unite 60-yr-old patient of Alzheimer’s with kin

Read Next

Protesting Congress leaders continue to be in prison

Leave a Reply