नारायण राणे सपत्नीक गोव्याहून दिल्लीला रवाना, गुरुवारी होणार केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी

0
109

सिंधुदुर्ग – खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी निश्चित झाली असून गुरुवारी 8 जुलै रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी खासदार नारायण राणे हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची राजकीय सूत्रांकडून पक्की माहिती मिळाली आहे. राणेंना कोणते मंत्रीपद देण्यात येणार याबाबत माहिती उपलब्ध झाली नसली तरी महाराष्ट्रात शिवसेनेला नडणारा भाजपचा अत्यंत आक्रमक चेहरा असलेल्या राणेंना राजकीय ताकद देऊन आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कमळ फुलविण्याचा भाजपा श्रेष्ठींचा मानस आहे.

मुंबईत भाजपला खासदार नारायण राणेंची असलेली राजकीय ताकद आणि स्वाभिमान संघटनेचे बळ यांच्या साथीने शिवसेनेचा प्राण असलेली मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात दिलेल्या स्थानामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. 4 जुलै रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांना थेट भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या दिल्लीतील कार्यालयातून 5 जुलै रोजी फोन आला होता. त्याचवेळी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागल्याची निश्चिती झाली होती. दरम्यान आज सकाळी राणे पत्नी नीलम यांच्यासह गोव्याला रवाना झाले असून आज दुपारी दीड च्या फ्लाईट ने ते सपत्नीक दिल्लीला रवाना होणार आहेत. तर खासदार राणे यांचे जेष्ठ सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे मुंबईतून आज दिल्लीला रवाना होणार आहेत. आमदार नितेश राणे हेही आज पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुंबईतून दिल्लीला रवाना होणार आहेत. गुरुवारी 8 जुलै रोजी खासदार नारायण राणे यांच्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रीपदाच्या शपथविधी साठी राणे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here