नारायण राणे यांना काही काम धंदा उरलेलं नाही खासदार विनायक राऊत यांनी केली टीका

0
121

सिंधुदुर्ग – सध्या नारायण राणे यांना तसं काही काम धंदा उरलेलं नाही. भाजपाने देखील त्यांना अडगळीत फेकून दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीकडे देखील फारसे कोणी लक्ष देत नाही. सतत मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून असलेला हा माणूस या ना त्या कारणाने प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशी टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं होतं. राणे यांचं हे पत्रं शहा यांनी केराच्या टोपलीत फेकून दिलं आहे, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

राणेंना धड हिंदी बोलता येत नाही

राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचं काय? तर असं काही तरी पत्रं द्यायचं. त्यामुळे त्यांनी हे पत्रं दिलं. इतकंच काय ते या पत्राचं महत्त्व आहे. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशा शब्दात राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.

त्यांचा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर डोळा

राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. त्यांचा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर डोळा राहिला आहे. मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न यशस्वी झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही, असा चिमटा काढतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही. तशी परिस्थिती येणारही नाही, असंही ते म्हणाले.

पत्रकार परिषद घेऊन राणे काय म्हणाले होते ?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं सांगतानाच आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचं राणे म्हणाले.

सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करा

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा करतानाच दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. जेलमधल्या रवी पुजारींच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झालीय. पुजारीलाही या प्रकरणात काही सांगायचे आहे, असं मी ऐकून आहे. त्यामुळे अजून कुणाच्या हत्या झाल्यायेत का? याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नारायण राणेंनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here