सिंधुदुर्ग – कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरम मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन संस्थांमध्ये सुरू होत आहे. या तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुभारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्या याबाबतची पूर्वतयारी संस्थास्तरावर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.