सिंधुदुर्ग – इन्सुली-खामदेव नाका परिसरात राहणाऱ्या कय्यूम कित्तूर यांच्या घरात तब्बल साडेसहा फुटी नाग आढळल्यानंतर घरातील सर्वांचेच होश उडाले.
हा प्रकार घरातील लहान मुलीने पाहिला आणि आरडाओरडा केला. त्यानंतर “तो” इतर व्यक्तींच्या निदर्शनास पडला. ही घटना काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती श्री. कित्तूर यांनी सर्पमित्र नवीद हेरेकर यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या सापाला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित नाग कित्तूर यांच्या घरात घुसला होता. दरम्यान तो घरातील एका कोपऱ्यात फणा करुन बसला होता. हा प्रकार त्यांच्या घरातील लहान मुलीने पाहिल्यानंतर तिने एकच आरडाओरडा केला.
यावेळी घरातील व्यक्तीने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता सगळ्यांचेच होश उडाले. फणा करून बसलेला भला मोठा नाग पहिल्यानंतर सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. त्यांनतर कित्तूर यांनी प्रसंगावधान दाखवत त्या सापाला न मारता याबाबतची माहिती सर्पमित्र हेरेकर यांना दिले.
माहिती मिळताच हेरेकर यांनी रात्रीचे साडेबारा वाजले असतानासुद्धा त्याठिकाणी अवघ्या पंधरा मिनिटात पोचत “त्या” सापाला जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.