सिंधुुदुर्ग – शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसएसपीएम) इंजिनिअरिंग कॉलेजचे वरिष्ठ अधीक्षक सागर सईकर यांनी कोविड १९ बाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करून भारतीय दंडसहिता अंतर्गत व डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, कणकवली उपविभागीय अधिकारी, कणकवली पोलिस निरीक्षक यांच्याकडे शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
सागर सईकर हे इंजिनिअरींग कॉलेजमध्ये वरिष्ठ अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांचे मुंबईहून सतत येणे जाणे होते. कणकवली आल्यानंतर जिल्ह्यातील शासकीय कार्यप्रणालीनुसार त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना इंजिनिअरींग कॉलेजच्या वसाहतीत होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. पण त्यांच्या आईंना कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही त्यांनी कॉलेजच्या स्टाफ मिटिंग घेतली. या मिटिंगला २५ ते ३० कर्मचारी उपस्थित होते.
सईकरच्या आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फक्त दोन व्यक्ती संपर्कात आल्याची प्रशासनाला खोटी माहिती दिली आहे. पण प्रत्यक्षात अनेक जण सईकर व त्याच्या आईच्या संपर्कात आल्यामुळे काहींना कोरोनाची लागण झाली असून अन्य काही जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी घेण्याचा आर्थिक भुर्दंड शासनावर पडला आहे. हा प्रकार घडून सईकर यांच्यावर राजकीय वरदहस्तामुळे अद्यापही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
सागर सईकर यांनी केलेल्या कृत्याचा जिल्हा प्रशासनाने विचार करून त्यांच्यावर कोविड १९ बाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करून भारतीय दंड संहिता अंतर्गत व डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक, कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, संदेश पटेल, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, गितेश कडु, राजू राठोड, प्रमोद मसुरकर, अनुप वारंग, ललित घाडीगावकर, अजित काणेकर, तेजस राणे, रुपेश आमडोसकर, रुपेश साळुंखे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.