उरले-सुरले भातपीकही गेले पाण्याखाली, जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु यावर्षी रेकॉर्डब्रेक 4920 मि. मी. च्या सरासरीने पाऊस कोसळला

0
48

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अवकाळी पावसाने अजूनही पिच्छा सोडलेला नाही. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे उरले-सुरले भातपीकही पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आजपर्यंतच्या सरसरीत जिल्ह्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक 4920 मि. मी. च्या सरासरीने पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने 23 ऑक्टोबरपर्यंत विजांच्या गडगडासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता भातपीक हाती लागण्याची शक्यता अजिबात दिसून येत नसल्याने ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी गेल्या दहा वर्षांत साधारणतः 3400 मि. मी. असते. जास्तीत जास्त 4000 मि. मी. च्या आसपास पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आतापर्यंत रेकॉर्डब्रेक 4920 मि. मी. च्या सरासरीने पाऊस कोसळला आहे. त्यामुळे ही सरासरी पाहता जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे.

पावसाळी हंगामाचा परतीचा पाऊस सप्टेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर पावसाने आठ दिवस विश्रांती घेतली होती. त्यामुळे भातकापणीला वेग आला होता. परंतु तेवढ्यात अवकाळी पावसाचे धुमशान सुरू झाल्याने कापणीला आलेले भातपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नुकसानीचे पंचनामे सुरू झाले. दरम्यान, गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे थोडे फार भातपीक हाती लागेल, अशी आशा शेतकरी वर्गाला होती. त्यामुळे उरले सुरले भातपीक कापून जमवाजमव करण्याची तयारी सुरू होती. मात्र, मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे उरली सुरली भातशेतीही पाण्याखाली गेली असून ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात अजून दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेत 23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर दामिनी ऍप डाऊनलोड करावे. तसेच या कालावधीत किनारपट्टीवर 40 ते 50 कि. मी. प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातर्फे देण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाचे नंबर जाहीर

कोणताही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 02362-228847/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रणकक्ष – 02362-228614, मालवण तहसील नियंत्रण कक्ष- 02365-252045, देवगड तहसील नियंत्रण कक्ष – 02364-262204, वेंगुर्ले तहसील नियंत्रण कक्ष- 02366-262053, दोडामार्ग तहसील नियंत्रण कक्ष- 02363-262204, सावंतवाडी तहसील नियंत्रण कक्ष- 02363-272028, कुडाळ तहसील नियंत्रण कक्ष – 02362-222525, कणकवली तहसील नियंत्रण कक्ष – 02367-232025, वैभववाडी तहसील नियंत्रण कक्ष – 02367-237239 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here