वादळी वा-यामुळे मुंबई-रायगडच्या   अडीचशे  नौका जयगड बंदरात आश्रयाला

0
241

मुसळधार पाऊस थांबला असला तरी खोल समुद्रातील वातावरण अद्यापही खवळलेलेच आहे. समुद्रातील वादळी वा-यांचा फटका रायगडसह मुंबईतील मासेमारी नौकांना बसला आहे. वादळी वा-यांमुळे मुंबई आणि रायगडमधील नौकानी जयगड बंदराचा आश्रय घेतला असून दुस-या दिवशीही या नौकांचा मुक्काम जयगड बंदरातच होता. रविवार ११  ऑगष्ट पर्यंत हायअलर्ट असल्याने आणखी दोन दिवस या नौका बंदरात उभ्या राहणार आहेत.
मासेमारी बंदी आदेश १ ऑगष्टला उठला असला तरी अजून मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्याएवढे पोषक वातावरण नाही. अतिवृष्टी आणि वादळी वाºयामुळे बंदी आदेश असूनही मासेमारीची मुहुर्त मच्छीमारांना साधता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी पाऊस कमी असल्याने ५ ते १० टक्के मच्छीमारांनी धोका पत्करून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित असा रीपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे सध्यातरी शंभर टक्के मासेमारी बंद असल्याचा मत्स्य विभागाचा दावा आहे. अशातच ११ तारखेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

रायगड आणि मुंबईत मच्छीमारांनी अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याची तमा न बाळगता मासेमारीचा मुहुर्त साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो चांगलाच अंगलट आला. समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे रायगड, मुंबई येथील २५० मच्छीमार आश्रयासाठी जयगड बंदरात आले आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने आठवडाभर ते या बंदरात आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील मच्छीमारांनाच बंदरात मासे उतरण्याची परवानगी असते. दुस-या जिल्ह्यातील मच्छीमारांना नाही. परजिल्ह्यातील हे मच्छीमार रत्नागिरीत मासे उतरून फायदा करून घेण्याच्या शक्यतेने स्थानिक मच्छीमारांनी त्याला विरोध केला. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर मत्स्य विभागाला याची माहिती मिळाली. मत्स्य विभागाने परजिल्ह्यातील मच्छीमारांना मासळी न उतरविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे वातावरण निवळले आहे. मासेमारी बंदी उठल्यानंतर अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा विचार न करता मुंबई-रायगडच्या नौका समुद्रात गेल्या होत्या. मात्र परिस्थिती धोकादायक बनल्याने ते जयगड येथे सुरक्षित बंदरात आश्रयाला आले आहेत.त्यांना मासे उतरविण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सहायक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here