सिंधुदुर्गात कोरोना लसीचा तुटवडा

0
101

सिंधुदुर्ग – जिल्ह्यासाठी 61 हजार 600 एवढी कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली तर आतापर्यंत सुमारे 60 हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लसीचा तुटवडा जाणवत असून जर वेळीच लस उपलब्ध झाली नसेल तर पुढील दोन दिवस सुरू असलेले लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी आरोग्य समिती सभेत दिली.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, सदस्य लॉरेन्स मान्येकर, प्रितेश राऊळ, उन्नती धुरी, श्रीया सावंत, कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर आदी उपस्थित होते.

1 मार्चपासून जिल्ह्यातील 55 लसीकरण केंद्रामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आतापर्यंत 61 हजार 600 एवढी लस प्राप्त झाली. सुमारे 60 हजार जणांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असून वेळीच आवश्‍यक असलेली लस उपलब्ध न झाल्यास पुढील दोन दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती डॉ. खलीपे यांनी दिली.

वेंगुर्ले तालुक्‍यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात अशुद्ध गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत समिती सदस्य प्रितेश राऊळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. लाल रंगाच्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने या पाण्याची तत्काळ तपासणी करा. शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा होईल या दृष्टीने कार्यवाही करा, अशी सूचना यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर अस्वच्छ आहे. अनेक ठिकाणी झाडे-झुडपे वाढली आहेत. याकडे तेथील आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. याबाबत मागील आरोग्य समिती सभेत सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. याबाबत आजच्या सभेत आढावा घेत अद्यापही ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसर स्वच्छ केलेला नाही अशा संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले.

आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरस्कार द्या
उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना, अंगणवाडीताईंना ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून उत्कृष्ट सेवा बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करा. अशी सूचना सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी आजच्या सभेत मांडली.

“त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अन्य साथीचे आजारही बळावण्याची शक्‍यता आहे. तरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. असे असतानाही जे आरोग्य कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा तथा आरोग्य सभापती संजना सावंत यांनी आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here