महाराष्ट्र राज्यभरात १० महिन्यात २ हजार २२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
106

सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, घसरणारा बाजारभाव आणि कर्ज, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया यामुळे महाराष्ट्र राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये २ हजार २२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली आहे.

यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी झाली. यासाठी शेतकरी संघटनांनी मोर्चेही काढले. मात्र, अद्याप राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या गडबडीत असल्याने शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात उशिर होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० हजार कोटींची मदत करणार असल्याची घोषणा केली. मात्र, सरकार स्थापनेला पक्षांचे एकमत होत नसल्याने ही घोषणाही हवेत विरल्याचे चित्र आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नहीत.यामध्येच लांबलेल्या परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले. तसेच बँका देखील पीककर्ज नाकारत असून विम्याची रक्कम मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. परिणामी, यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यभरात जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी स्वत:चे आयुष्य संपवले आहे. यामध्ये सर्वाधिक ८४८ आत्महत्या अमरावती विभागात, तसेच यापाठोपाठ औरंगाबाद विभागात ७१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातील अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ हे तिन्ही जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पुन्हा एकदा ‘डेंजर झोन’मध्ये आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात २२७, तर बुलडाण्यात २२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

विशेषतः अमरावती विभागात आणि दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान शासनापुढे उभे आहे. सिंचनात समृद्ध असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे चित्र आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन योजना पोहोचल्या असूनही पुणे विभागात ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाशिक विभागात द्राक्षबागांना परतीच्या पावसाने झोडपल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे. नाशिक विभागात एकूण ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आत्महत्येची आकडेवारी – विभागनिहायपुणे – ६९, नाशिक – ३९१, औरंगाबाद – ७१५, अमरावती – ८४८, नागपूर – १८३, कोकण – ०१.

सर्वाधिक आत्महत्या – जिल्हानिहाय – अमरावती – २१५, बुलडाणा – २२३, यवतमाळ – २२७, बीड – १५८, उस्मानाबाद – ९९, औरंगाबाद – १०७, अहमदनगर – १०७.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here