निलेश राणेंच्या कारकिर्दीतच  स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या ?- वैभव नाईक

0
103

दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या.मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटीसा का आल्या? तुम्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला विचारल्या शिवाय नोटीसा काढण्याची हिम्मत अधिकारी कशी काय करतात? त्यामुळे यामागे राजकारण आहे हे दिसून येते. नोटिसाबाबत निलेश राणेंनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन केवळ दिखावेगिरी करत मच्छीमारांची फसवणूक केली आहे. देवगड, वेंगुर्ले मध्ये अशा नोटिसा आल्या नाहीत मात्र मालवण मध्येच नोटिसा का आल्या? स्थानिक मच्छीमार व स्थानिक हॉटेल व्यवसायिकांनी अशा नोटिसांना भीक घालू नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मी आपल्या पाठीशी आहे. गोरगरीब स्थानिक मच्छिमारांच्या बांधकामांना अधिकाऱ्यांनी हात लावला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

वैभव नाईक म्हणाले,  मालवण किनारपट्टीवर गोरगरीब स्थानिक मच्छिमारांना व स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या आहेत.काही लोक राजकारण करण्यासाठीच नोटिसा पाठवत आहेत.आमदार निलेश राणे यांनी या नोटिसाबाबत प्रांताधिकारी यांची भेट घेतली. परंतु प्रांताधिकारी यांना भेटून या नोटिसा थांबणार आहेत का? आणि निलेश राणे सत्ताधारी आमदार असताना त्यांना विचारल्याशिवाय  अधिकारी नोटिसा कशा काय देऊ शकतात. त्यामुळे निलेश राणे केवळ मच्छीमारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करीत आहेत हे उघड झाले आहे.  मागील १० वर्षात नोटिसा आल्या नाहीत मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटीसा का आल्या?  लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कमी पडत आहात कि काय? याचे उत्तर निलेश राणेंनी दिले पाहिजे असे आव्हान वैभव नाईक यांनी दिले आहे.

किनारपट्टीवर स्थानिक गोरगरीब मच्छिमारांनी आपल्या घराचे बांधकाम केले आहे. पारंपरिक मच्छीमारी सोबत काहीजणांनी छोटा हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्यावर ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी किनारपट्टीवरील कोळी बांधवांना मोफत जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली होती. स्वयंघोषित  मच्छीमार नेत्यांनी त्यावेळी त्यांचा सत्कार देखील केला होता. त्या घोषणेचे काय झाले? ती घोषणा निवडणुकी पुरतीच होती काय? त्यामुळे आता स्थानिकांच्या बांधकामांना अधिकाऱ्यांनी हात लावला तर गाठ आमच्याशी आहे. स्थानिक मच्छीमारांनी अशा नोटिसांना भीक घालू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मी आपल्या पाठीशी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय धनदांडग्यांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे बांधली आहेत. त्यांना आधी महसूलच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा काढाव्यात असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here