तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 कोटी 77 लाखांचे नुकसान, दोघांचा मृत्यू तर तिघे बेपत्ता जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम

0
99

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. या वादळामुळे मच्छिमार नौका बुडून दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा प्रशासन स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही.

खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान

या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पुर्णतः नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे.

तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणला

तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटा हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरीत सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

दोघं खलाशांचा मृत्यू, तीन खलाशी अजूनही बेपत्ता

देवगड येथे नौका बुडाल्यामुळे दोघा खलाशांचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे . या दोघांचेही मृतदेह सोमवारी येथील समुद्र किनारी सापडले आहेत. समुद्रात बुडालेल्या पैकी तीन जण अद्यापहीही बेपत्ता आहेत. त्यांचा प्रशासनाकडून स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरु आहे. तर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे 2021 रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here