गोव्याच्या पर्ससीन बोटीवर कारवाई करा सर्जेकोट-कोळंब येथील मच्छीमारांचा पोलिसांत अर्ज

0
191

 

सिंधुदुर्ग – परप्रांतीय एलईडी पर्सनेट मच्छीमारांकडून गुन्हेगारी स्वरुपाचे कट कारस्थान करून मालवणमधील स्थानिक मच्छीमारांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नौका Sea Blessia Dorita-2 चे मालक व बोटीवरील कर्मचारी यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज सर्जेकोट येथील जगन्नाथ अंकुश सावजी व इतर मच्छीमारांनी मालवण पोलिसांत दिला आहे.

सर्जेकोट आणि कोळंब येथील मच्छीमारांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, रवीकांत जनार्दन आजगावकर यांच्या मालकीची हेमांगी ही मच्छीमारी नौका 27 मे रोजी मच्छीमारीसाठी मालवण बंदरातून गेली होती. 27 व 28 मे रोजी मोठय़ा प्रमाणात मासे मिळाल्याने बर्फ कमी पडणार, असा संदेश आजगावकर यांना आला. नंतर आजगावकर यांनी सर्जेकोट बंदरात उभी असलेली नारायण आडकर यांची ओमकार नौका घेऊन आम्हाला बर्फ नेऊन आपल्या बोटीवरील मासे घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही 29 मे रोजी पहाटे 5 वाजता निघालो. हेमांगी ही नौका 18 वावात मासेमारी करत होती. त्याच्या आसपास म्हणजे सुमारे 20 वावात Sea Blessia Dorita-2 ही बोट एलईडी पर्सनेटच्या सहाय्याने मासेमारी करताना आम्हाला दिसली. हेमांगी बोटीतील सुरमई, बांगडा, म्हाकूळ आणि इतर मासे ओमकार बोटीमध्ये उतरवून घेऊन हेमांगी बोटीला बर्फ दिले आणि हेमांगी बोट मच्छीमारीला निघून गेली.

Sea Blessia Dorita-2 या बोटीला 12 नॉटीकल मैलाच्या आत एलईडी पर्सनेट करू नये, अशी विनंती करण्यासाठी आम्ही ओमकार नौका घेऊन त्या बोटी जवळ गेलो. त्या बोटीवर सुमारे 30 ते 35 कर्मचारी दिसले. येथे मासेमारी करू नका, या आमच्या विनंतीला धूडकावून लावत त्यांनी उर्मटपणे अरेरावीचे उत्तर दिले, महाराष्ट्र शासन आमचे काही बिघडवू शकत नाही. तुम्ही आम्हाला काय समजावणार, असे बोलून त्यातील एकाने आमच्यावर एलईडी बल्ब फेकून मारला. सुदैवाने तो बल्ब पाण्यात पडला. पुरावा म्हणून लगेचच आम्ही पाण्यात उतरून तो बल्ब ताब्यात घेतला. आपली गुन्हेगारी पकडली जाणार, या भीतीने त्यांनी आपली बोट वळवून आमच्या ओंकार बोटीवर चढविण्याचा प्रयत्न केला. ती अवाढव्य नौका आमच्या बोटीच्या अंगावर घातल्याचे बघून आम्ही घाबरलो व लगेच आमची बोट किनाऱयाच्या दिशेने वळवली. आम्ही किनारा गाठण्याचा प्रयत्न करताना ओंकार बोटीचे मालक नारायण आडकर यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि मदतीची मागणी केली. तसेच वेगाने सर्जेकोटच्या दिशेला बोट वळवून किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु 9-10 वावात गोव्याच्या बोटीने आम्हाला गाठले. त्यांनी पुन्हा ओंकार बोटीवर आपली Sea Blessia Dorita-2 ही बोट घालण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या कृत्याचा पुरावा म्हणून आम्ही मोबाईलमधून त्या बोटीचे शूटिंग करायला सुरुवात केली. आपले शूटिंग सुरू आहे, याची कल्पना येताच, गोव्याच्या नौकेने वळण घेऊन खोल समुद्राच्या दिशेने पळ काढला, असे मच्छीमारांनी तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रार अर्जावर जगन्नाथ सावजी, किशोर कांदळगावकर, निहाल आडकर, मयुर खवणेकर, पुंडलिक शेलटकर, रजनीकांत देऊलकर, हर्षल वराडकर, जगदिश कांदळगावकर, केदार कुडाळकर, रजनीकांत पराडकर, गोविंद सावजी, राहुल आडकर, तेजस फोंडबा, हनुमंत कवटकर, नीलेश आडकर, ओंकार कवटकर, वृषभ आजगावकर यांच्याही सहय़ा आहेत.

एलईडी पर्सीनेट या गोव्यातील नौकेने महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी पर्सनेट मासेमारी केल्याने मत्स्य खात्याच्या मदतीने कायदेशीर कारवाई करून ही बोट जप्त करावी. भर समुद्रात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी Sea Blessia Dorita-2 एलईडी पर्सनेट या बोटीचे मालक व त्यावरील कर्मचाऱयांवर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. एका पोलिसाने पंचनाम्यावेळी मच्छीमारांना बेदम मारहाण केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. आमच्या ओंकार बोटीवरून ताब्यात घेतलेल्या रवीकांत जनार्दन आजगावकर यांच्या माशाच्या विक्रीची रक्कम व्याजासकट पुन्हा मिळावी. सागरी पोलिसांनी बोट बेकायदेशीर ताब्यात घेतल्याने आम्हाला जे नुकसान होत आहे, त्याची भरपाई मिळावी. पोलीस कारवाई दरम्यान नीलेश रमेश आडकर हा मच्छीमार चक्कर येऊन बोटीवर पडला असता, त्याला मदत करण्याऐवजी एका पोलीस अधिकाऱयाने शिवीगाळ करून ‘उठ-नाहीतर बंदुकीने ठोकीन’ अशी धमकी दिली. या अधिकाऱयाची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. ओमकार बोट सागरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ती आमच्या तात्काळ ताब्यात द्यावी. दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशा प्रमुख बाबी या तक्रार अर्जात नोंदविल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here