गोवा-सिंधुदुर्गात आपल्या नौका वाचविण्यासाठी मच्छिमारांची धडपड, देवगड बंदरात शेकडो नौका आश्रयाला

0
104

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यापासून अजून ३५० किमी लांब असून हे वादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने ५० ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने सरकत आहे. या वादळातून बचावासाठी कर्नाटक आणि गोवा राज्यातील शेकडो मच्छिमार नौका सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत. तर विजयदुर्ग बंदरातही नौकांना आश्रय देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. गोव्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान गोव्यात १ जूनपासून मासेमारीवर बंदी घातल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

गोव्यापासून वादळ अजून ३५० किमी लांब

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. यामध्ये पुण्यातल्या एका पथकाचाही समावेश आहे. काही तासापूर्वी हे पथक गोव्यात दाखल झाले. आहे. तर इतर पथकं हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच आली आहेत. एनडीआरएफचे डीजी एस. एन. प्रसाद यांनी ही माहिती दिली. या चक्रीवादळावर गोव्यातून लक्ष ठेवलं जातं आहे. रडारद्वारे या वादळाची तीव्रता किती आहे याचं मापन केलं जातं आहे. दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यापासून हे वादळ साधारण ३५० किमी लांब आहे अशी माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

आपल्या नौका वाचविण्यासाठी मच्छिमारांची धडपड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढत चाललेला प्रभाव, त्यात तिसऱ्या लाटेची लोकांच्या मनात असलेली भीती आणि सरकारने घोषित केलेले लॉक डाऊन यामुळे सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या ऐन हंगाम अडचणींचा गेला आहे. त्यात पान्हा एकदा ‘तौक्ते’ चक्रीवादळाने येथील किनाऱ्याला धडकण्याचा इशारा दिल्यानंतर येथील मच्छिमार मोठ्या अडचणीत आले आहेत. हे वादळ काही तासांत गोवा आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर आदळणार असल्याने आज सकाळपासूनच येथील मच्छिमारांनी आपल्या मच्छिमार बोटी मिळेल त्या साधनांच्या माध्यमातून किनाऱ्यावर घ्यायला सुरवात केली आहे. केरळच्या किनाऱ्यावर या वादळामुळे झालेली वाताहत समोर आल्यानंतर येथील मच्छिमारांमध्ये आपल्या मच्छिमार नौका वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

गोवा-कर्नाटकच्या नौका देवगड बंदरात आश्रयाला दाखल

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि गोवा राज्यातील शेकडो मच्छिमार नौका सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे देवगड बंदर नौकांनी फुलून गेले आहे. सिंधुदुर्ग मधील देवगड बंदर सर्वात सुरक्षित मानलं जातं. ज्या ज्या वेळी अशी स्थिती उदभवण्याची शक्यता असते त्यावेळी नेहमीच लगतच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात. देवगड बंदरात जागा पुरली नाही तर यावेळी आश्रयासाठी येणाऱ्या नौकांना विजयदुर्ग बंदरात ठेवण्याचे नियोजन प्रशासन आणि बंदर विभागाकडून करण्यात आले आहे.

गोवा-सिंधुदुर्गात वाहणार ८० ते ९० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले , मालवण आणि देवगड तालुक्यांना शनिवार सांयकाळपासून उद्या रविवार पर्यंत अति दक्षतेचा इशारा आपत्कालीन विभागाने दिला आहे . या ठिकाणी वाऱ्याचा वेग ८० ते ९० किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर गोव्याच्या किनाऱ्यावर या वादळामुळे ८० ते ९० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हे वादळ राज्यात आर्थिक नुकसान करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. लक्षद्वीप येथून हे वादळ काल शुक्रवारी गोव्याच्या दिशेने निघाले आहे. ते शनिवारी सकाळी केरळ येथील कन्नूर येथे धडकेल. तेथून ते अरबी समुद्रात कर्नाटक आणि पुढे गोवा व महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार आहे. असे हवामान खात्याने म्हटले आहे.

गोव्यात १ जूनपासून मासेमारीवर बंदी

राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मच्छिमारीवर बंदी घातल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. दरवर्षी मच्छिमारी बंदी कालावधी ६१ दिवसांचा असतो. पण गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात मच्छिमारांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारने १५ जून ते ३१ जुलै असे ४७ दिवस मच्छिमारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारनेही गोव्यात ४७ दिवस बंदी घातली होती. पण यंदा ही बंदी ६१ दिवसांची राहणार आहे.

गोव्यात दोन ठिकाणी कोसळली वीज

शुक्रवारी रात्री खोर्ली-म्हापसा आणि नास्नोळा येथे माडांवर वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. खोर्लीत गणपती मंदिरावर वीज कोसळल्यानंतर तिची ठिणगी काही अंतरावरील माडावर पडली. त्यामुळे माडाने पेट घेतला. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. काही काळ वीजपुरवठा खंडित राहिला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here