कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस

0
158

सिंधुदुर्ग – सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ नेमकी कधीपासून सुरू होणार? अशी गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या उद्घाटनासाठी अखेर ‘काउंट डाऊन’ सुरू झाले आहे. शुभारंभासाठी नवीकोरी सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाडी मडगावमध्ये दाखल झाली आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा बावटा दाखवणे अपेक्षित असल्याने यासाठी सर्व तयारी गोव्यातील मडगाव स्थानकात करण्यात आली आहे.

संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन कोकण रेल्वेच्या मार्गावर नेमकी कधी सुरू होणार, याबाबत मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ‘ट्रायल रन’ यशस्वीपणे घेण्यात आली. त्यामुळे आता या गाडीला हिरवा झेंडा नेमका कधी दाखवला जातो, याची चर्चा सुरू झाली होती. ती प्रतीक्षा आता संपली आहे. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमधून मडगाव-मुंबई मार्गावर चालवण्यासाठी आठ डब्यांची नवी कोरी गाडी गोव्यात मडगाव यार्डात उभी आहे. कोकणातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर मडगाव जंक्शनमध्ये रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे.

आता या गाडीला नेमका हिरवा झेंडा कधी दाखवला जातो, गाडीचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार या बाबतची उत्सुकता प्रवाशांमध्ये आहे. रेल्वेकडून या गाडीच्या उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या वंदे भारत एक्स्प्रेसने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- तारकर्ली, वेंगुर्ले तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतील अशी आशा येथील व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत. जलदगती प्रवास होणार असल्याने मुंबई स्थित चाकरमान्यांनाही दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here