कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत, राज्यात पावसाची शक्यता

0
147

येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, मिऱ्या, जयगड बंदरात इतर राज्यांमधील हजारो नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ‘कयार’ नावाच्या चक्रीवादळात झाले असून ते महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीपासून १९० किलोमीटरवर आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आठवडय़ापासून पाऊस सुरू आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी रत्नागिरीपासून १९० किलोमीटर, तर मुंबईपासून ३४० किलोमीटरवर होते. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहत आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कोकणच्या किनारपट्टीपासून जवळ असलेले ‘कयार’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. ते येत्या पाच दिवसांत ओमानच्या किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमी होईल आणि पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे. कोकणातील भातशेतीचे गेल्या  चार-पाच दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  कापणीस योग्य झालेले पीक वाया गेल्यामुळे  शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here