राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या १. केम्सपेक केमिकल्स प्रा. लि. २. हायकल लिमिटेड ३. उल्का सी फूड्स प्रा. लि. ४. स्टेलर मरिन या चार कारखान्यांचे संमती पत्र रद्द करण्यात आले असून त्यांना उत्पादन थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच तीन कारखान्यांवर प्रस्तावित निर्देश देण्यात आले असून एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसून राहत असल्यामुळे त्यांच्या या कार्यप्रणालीवरच संशय व्यक्त केला जात आहे. प्रदूषण महामंडळाचे आशीर्वाद सोबत असल्यामुळे कारखानदारांनी पत्रकारांनाही कंपनीच्या प्रवेशद्वारावरून प्रवेश नाकारून भेट देण्यासही ते तयार नाहीत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता आपण याबाबत काहीही बोलू शकत नसल्याचे उत्तर देऊन त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे हितगुज कारखानदारांशी जुळले आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तळोजा औद्योगिक विभागातील प्रदुषण येथील स्थानिक नागरिकांचे जीवन नष्ट करत त्यांचे आयुष्यमानच कमी करीत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे नागरिकांना अनेक घातक रोग झाले आहेत. या विघातक प्रदुषणाने गुदमरलेल्या नागरिकांनी काही प्रमाणात आपले बस्तान पनवेल, खारघर सारख्या शहरात मांडले. पण येथील सामान्य नागरिकांना विघातक प्रदुषण श्वासाद्वारे शरीरात घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे जीवघेण्या प्रदुषणाने त्रस्त असलेल्या जनतेच्यावतीने येथील स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे व काही समाजिक कार्यकर्त्यानी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत स्थानिक जनतेची या विघातक प्रदुषणा पासून मुक्ततता करण्याचा प्रयत्न सुरू केला.
याचाच एक भाग म्हणून प्रदुषण करणा-या आठ कंपन्यावर कारवाई करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत वेळोवेळी स्पेशल सर्वे करून ही कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील अशा प्रदुषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला कारखानदारांकडून केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक मूग गिळून बसले असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. कारखान्यांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देऊन आजमितीला देखील कारखाने सुरू असल्याचे चित्र तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दिसत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची खात्रीलायक छायाचित्रे व व्हिडीओ सादर केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी संबंधित कंपन्यांवर आम्ही कारवाई करू असे पोकळ आश्वासन दिले होते. मात्र आज ४५ दिवस उलटून गेले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या कारखान्यांवर दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या या कार्यप्रणालीवर परिसरातून संशयाच्या नजरेतून पहिले जाय आहे.
बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या कंपन्या : १. केम्सपेक केमिकल्स प्रा. लि.२.हायकल लिमिटेड ३.उल्का सी फूड्स प्रा. लि.४.स्टेलर मरिन.
प्रस्तावित निर्देश दिलेले कारखाने : १ कॅस्टल रॉक फिशरीज लि.२.व्हि.व्हि.एफ. लिमिटेड ३. युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड.
कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेला कारखाना : १. फोरस्टार फ्रोजन फुड्स प्रा. लि.
(सौजन्य: www.sahajshikshan.com )