आमदार नितेश राणेंच्या वकिलांनी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु

0
85

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आ. नितेश राणे यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुमारे पावणे दोन तास यावर सुनावणी सुरू असून आ. राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी बाजू मांडताना “नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता” अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी भाजप आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी आ. राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दाखल करून घेताना न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज सकाळी ही सुनावणी सुरू झाली आहे. आ. नितेश राणे येथे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत माजी खा. निलेश राणे हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी हे सुद्धा उपस्थित असून आ. राणे यांच्यावतीने प्रख्यात वकील संदीप मानशिंदे, संग्राम देसाई व अन्य वकील उपस्थित आहेत. यावेळी जामीन मिळण्यासाठी बाजू मांडताना संदीप मानशिंदे यांनी “पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता”, असे दिसत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here