सिंधुदुर्ग – अलीकडे गोव्यातील एलईडी मच्छीमारी ट्रॉलर्स वरील मासळी स्थानिक मच्छिमार बांधांवांकडून लुटण्याचा प्रकार मालवणच्या समुद्रात घडला आणि पुन्हा एकदा आधुनिक विरुद्ध पारंपरिक असा भर समुद्रातील संघर्ष पेटला. हा संघर्ष सागरी क्षेत्राच्या कोणत्या भागात कोणत्या प्रकारच्या बोटीने मासेमारी करावी यावरून असून आता वादावर कायमचा तोडगा काढण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांची पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने डिजिटल योजना साकारत असून आता या पुढच्या काळात समुद्रात प्रत्येक बोटीवर शासनाचा लक्ष असणार आहे.
कोकणच्या प्रामुख्याने सिंधुदुर्गच्या समुद्रातील हा संघर्ष समजून घेतला पाहिजे. गेली अनेक वर्ष कोकणच्या समुद्रात पर्ससीन मच्छीमारीबरोबरच एलईडी मच्छीमारी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची मच्छीमारी आणि पारंपरिक मच्छीमारी यांच्यात सीमावाद निर्माण झाला आहे. याबाबत मालवणमधील मच्छीमार नेत्यांशी बोलल्यावर
मुळात येथील समुद्रात अनधिकृत पर्ससीन मच्छीमारी सुरु होती. त्याला रोखण्यात शासनाला अपयश आले त्यातून एलईडी मच्छीमारीचा भस्मासुर निर्माण झाला असे मालवणमधील क्रियाशील मच्छीमार आणि मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी सांगितले. मुळात १२ सागरी मैलाच्या पलीकडे म्हणजे केंद्र शासनाच्या हद्दीत या मच्छीमारांनी मासेमारी करायची आहे. मात्र राज्य शासनाच्या किंबहुना पारंपरिक मच्छीमाराना ठरवून दिलेल्या हद्दीत हे लोक मासेमारी करतात त्यामुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे. त्याला मासे मिळेनासे झाले आहेत. असेही पराडकर यांनी सांगितले.
तामिळनाडू, पॉण्डेचारी, गोवा, गुजरात, मुंबई व रत्नागिरी येथील एलईडी मासेमारी करणारे ट्रॉलर शासनाचे नियम डावलत सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर मासेमारी करू लागले. यातून येथील मासळीची बेसुमार लूट होऊ लागली. यात स्थानिक पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला. याबाबत वेळोवेळी लक्ष वेधून शासन लक्ष देईना. यातून भर समुद्रात संघर्ष उभा राहिला, तो आणखीन वाढत जाईल असे श्रमिक मच्छिमार संघ मालवणचे अध्यक्ष छोटू सावजी यांनी सांगितले.
दरम्यान आता या सततच्या संघर्षावर कायमचा तोडगा काढण्याचा विचार सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून समोर येत आहे. रडार आणि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून आम्ही समुद्रातील मच्छिमारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि इथला संघर्ष रोखण्यासाठी सक्षम अशी मॉनिटरिंग सिस्टीम आम्ही विकसित करत आहोत असे डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले. पुणे विद्यापीठासोबत आपण या योजनेला मूर्त स्वरूप आणले आहे. याबाबत सरकारशी आपली चर्चा झाली आहे. असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
दरम्यान या मॉनिटरिंग सिस्टीममुळे येथील समुद्रातील संघर्ष कितपत रोखला जातो, कि तो भविष्यात आणखीन वाढत जाऊन जीवघेण्या स्पर्धेत रूपांतरित होतो हे येणाऱ्या काळातच समजेल.